गुरुवार, ६ जून, २०१३

रोगाची लक्षणे जाणून करूयात उपाययोजना

महाराष्ट्रात सोयाबीनखालील क्षेत्रात वाढ होत असतानाच सोयाबीनवरील रोगांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. नुकसान टाळण्यासाठी सोयाबीनवरील विविध रोगांच्या लक्षणांची व उपाययोजनांची माहिती असणे गरजेचे ठरते. डॉ. डी. जी. मोरे, डॉ. के. एस. बेग
सोयाबीनवरील प्रमुख रोग
1) चारकोल रॉट (मूळकूज) (Charcoal rot)
* हा रोग मॅक्रोफोमिना फॅसिओलिना (रायझोक्‍टोनिया बटाटीकोला) Macrophomina phaseolina, [Rhizoctonia bataticola] या बुरशीमुळे होतो.
* या बुरशीचा प्रसार बियाण्याद्वारे व मातीतून होतो.
* जमिनीत ओलाव्याची कमतरता व उष्ण वातावरणात या रोगाचा प्रसार वेगाने होतो.
* या रोगामुळे रोपावस्थेतील पिकाची मुळे कुजून रोपे वाळतात व मरतात.
* प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडाची किंवा मुळाची साल काढून बघितल्यास आत असंख्य लहान, गोलाकार, काळ्या रंगाच्या रोगपेशी (स्क्‍लेरोशिया) दिसतात.
* या रोगामुळे उत्पादनात 77 टक्केपर्यंत घट होऊ शकते.
व्यवस्थापन -
1) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी (एन.आर.सी. 37, एम.ए.सी.एस. 13).
2) पेरणीपूर्वी थायरम तीन ते चार ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
3) पिकांची फेरपालट करावी.
4) मिश्र पीक पद्धतीसुद्धा रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करते.
2) कॉलर रॉट (Collar rot/ Sclerotial blight)
* हा रोग स्क्‍लेरोशियम रोल्फसी (Sclerotium roifsli) बुरशीमुळे होतो.
* झाडाच्या जमिनीलगतच्या खोडावर पांढऱ्या रंगाचे कापसासारखे धागे दिसतात व त्यावर लालसर रंगाच्या रोगपेशी (स्क्‍लेरोशिया) दिसतात. त्यानंतर खोडाचा हा प्रादुर्भावग्रस्त भाग सडतो व झाड सुकून झुकते/ कोलमडते व खाली पडते.
* लहान रोपे लगेच मरतात, तर मोठी झाडे प्रथम पिवळी पडतात व नंतर मरतात.
* शेतीची मशागतीची कामे, वारा व पाण्याद्वारे या रोगपेशी (स्क्‍लेरोशिया) सर्वत्र पसरतात.
* या रोगामुळे उत्पादनात 30 ते 40 टक्केपर्यंत घट होऊ शकते.
व्यवस्थापन -
1) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी (एन.आर.सी. 37).
2) शेतात स्वच्छता राखणे. या रोगाने प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून गोळा करून नष्ट करावीत.
3) पिकांची फेरपालट करावी.
3) पॉड ब्लाइट (शेंगा वाळणे)/अँथ्रॅक्‍नोज (pod blight/ Anthracnose)
* हा रोग कोलेक्‍टोट्रीकम डिमॅशियम (Collectotrichum dematium f. sp. truncatum) या बुरशीमुळे होतो.
* या बुरशीचा प्रसार बियाण्याद्वारे होतो, तसेच प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या अवशेषांवरही ही बुरशी जगते.
* या रोगामुळे उत्पादनात सर्वसाधारणपणे 16 ते 25 टक्केपर्यंत घट होते; परंतु प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्यास 100 टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते.
* जास्त तापमान व जास्त आर्द्रता या रोगास पोषक ठरते.
* पीक फुलोऱ्यात असताना खोड, पाने व लागलेल्या शेंगांवर विविध आकारांचे लालसर, गडद तपकिरी रंगाचे ठिपके/ चट्टे दिसतात. त्यानंतर याच भागावर बुरशीच्या बीजांडकोषांचे काळ्या रंगाचे आवरण चढते.
* प्रादुर्भावग्रस्त शेंगा सुरवातीस पिवळसर- हिरव्या दिसतात व नंतर वाळतात.
* प्रादुर्भावग्रस्त शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत किंवा भरलेच तर ते अतिशय लहान, सुरकुतलेले दिसतात.
* पाने पिवळी तपकिरी होणे, वाकडी होणे व गळणे हीसुद्धा या रोगाची लक्षणे आहेत.
* प्रादुर्भावग्रस्त झाडांचे उत्पादन पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरल्यास निघणारी रोपे लगेच मरून जातात.
व्यवस्थापन -
1) पेरणीसाठी स्वच्छ बियाणे वापरावे.
2) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी (उदा. ब्रॅग).
3) रोगग्रस्त झाडांचे अवशेष नष्ट करावेत.
4) पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम तीन ते चार ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
5) मॅन्कोझेब (75 डब्ल्यूपी) बुरशीनाशकाच्या 0.2 टक्के तीव्रतेची फवारणी करावी.
4) तांबेरा/ गेरवा (Rust)
* हा रोग फॅकोस्पोरा पॅचीरिझी (phakopsora pachyrhizi) या बुरशीमुळे होतो.
* तापमान 18 ते 28 अंश सेल्सिअस व आर्द्रता 80 टक्केच्या जवळपास असताना व पानांवर सतत तीन ते चार तास ओलावा असल्यास या रोगाच्या प्रादुर्भावाची शक्‍यता वाढते.
* पानाचा सर्व पृष्ठभाग लालसर तपकिरी भुरकट रंगाच्या चट्टे/ ठिपक्‍यांनी भरून जातो. हे ठिपके पानाच्या पृष्ठभागाच्या वर उभारून आलेले दिसतात. या ठिपक्‍यांच्या आजूबाजूचा भाग पिवळा पडतो.
* असे ठिपके सर्वांत अगोदर झाडाच्या खालच्या पानांवर खालील बाजूने येतात.
* नंतर हे ठिपके गडद भुरकट काळसर रंगाचे होतात. पाने हळूहळू पिवळी पडून वाळतात.
* रोगाच्या प्रादुर्भावाने एका आठवड्याच्या आतच पूर्ण पिकाची पाने गळून जातात. उत्पादनात 40 ते 80 टक्केपर्यंतही नुकसान होऊ शकते.
* प्रादुर्भावग्रस्त पानांवर बोटे फिरवल्यास भुरकट रंगाची पावडर बोटांना लागते.
व्यवस्थापन -
1) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी. (एम.ए.यू.एस. 61-2)
2) सुरवातीच्या अवस्थेतील प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत.
3) हेक्‍झाकोनॅझोल (पाच ईसी) किंवा प्रोपिकोनॅझोल (25 ईसी) 800 मि.लि. किंवा ट्रायडिमेफॉन (25 डब्ल्यूपी) 800 ग्रॅम प्रति 800 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रावर फवारणी करावी.
4) मॅन्कोझेब (75 डब्ल्यूपी) किंवा झायनेब (75 डब्लूपी) 2500 ग्रॅम प्रति 1000 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रावर फवारणी करावी.
5) दाणे जांभळे होणे (Purple seed stain)
* हा रोग सरकोस्पोरा किकुची (Cercospora kikuchii) या बुरशीमुळे होतो.
* बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
* अशा बियाण्यापासून उगवलेली रोपे लवकर मरण्याची शक्‍यता असते.
* हा रोग तुलनेने कमी प्रमाणात येतो.
व्यवस्थापन -
1) चांगल्या प्रतीचे प्रमाणित बियाणे वापरावे.
2) पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन तीन ते चार ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
6) यलो मोझाईक (Yellow mosaic)
* हा रोग मुगावरील यलो मोझाईक विषाणूंमुळे (MBYMV) होतो.
* पांढरी माशीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
* पेरणीनंतर 75 दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठे नुकसान होते; परंतु 75 दिवसांनंतर प्रादुर्भाव झाल्यास फारसे नुकसान नाही.
* प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या पानांवर पिवळ्या-हिरव्या रंगाच्या चट्ट्यांचे मिश्रण दिसते.
* जास्त प्रादुर्भावात पाने पूर्णपणे पिवळी होतात.
* त्यानंतर पानांच्या पिवळ्या भागावर गडद भुरकट- तपकिरी रंगांचे ठिपके दिसतात व पाने मलूल झाल्यासारखी दिसतात.
व्यवस्थापन -
1) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी. (जे.एस. 97-52)
2) प्रादुर्भावग्रस्त रोपे शोधून काढून ती नष्ट करावीत.
3) पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन करावे (थायामेथोक्‍झाम (25 डब्ल्यूपी) दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी)
7) सोयाबीन मोझाईक (Soybean Mosaic)
* हा रोग सोयाबीन मोझाईक विषाणूमुळे (SMV) होतो.
- या रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे, झाडाचा रस व बियाण्यांद्वारे होतो.
* प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते व त्यांची पानेही लहान, अरुंद दिसतात.
* प्रादुर्भावग्रस्त बियाणे उगवत नाही किंवा त्यापासून रोगग्रस्तच रोप उगवते.
व्यवस्थापन -
1) बियाणे विषाणूविरहित असावे.
2) शेतातील तणे काढून टाकावीत. पिकावरील माव्याचे व्यवस्थापन करावे (थायामेथोक्‍झाम (25 डब्ल्यूपी) दोन ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 ई.सी. 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी).
3) प्रादुर्भावग्रस्त रोपे शोधून काढून ती जाळून नष्ट करावीत.
4) रोगास प्रतिकारक्षम वाण वापरावेत (एम.ए.सी.एस. 58, एम.ए.सी.एस. 124)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा