शनिवार, १ डिसेंबर, २०१२

पेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर

नागठाणे - येथील विक्रम साळुंखे यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीऐवजी पेरूची मिडो ऑर्चर्ड पद्धतीची शेती केली आहे. त्यात भुईमूग, कोबी आणि मिरची आंतरपिकाने त्याला चांगला आधार दिला आहे. पेरूतूनही चांगले उत्पादन मिळण्यास सुरवात झाली आहे. नोकरीच्या मागे धावण्याऐवजी आपल्या शेतामध्ये लक्ष दिल्यास पदवीधर अधिक चांगल्या प्रकारे उत्पादन व उत्पन्न मिळवू शकतात, हे यातून दाखवून दिले आहे.
विकास जाधव
घरी शेती असताना ती पडीक ठेवून अनेक युवक नोकरी शोधत बसतात. शेतीला अद्याप आपल्या समाजामध्ये तेवढी प्रतिष्ठा नाही. अशा अनेक तरुणांपैकी एक सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील विक्रम साळुंखे हा पंचविशीतील पदवीधर. नुसत्या पदवीच्या साह्याने नोकरी शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला. नोकरी मिळत नाही, असे दिसल्यावर घरची शेती करायला नाइलाजाने तयार झाला. वडिलांसह पाच भावांची एकत्रित 25 एकर शेती आहे. ती पारंपरिक पद्धतीने केली जाते. विहिरीस पाणी कमी असल्यामुळे बागायत शेतीचे क्षेत्र कमी होते. पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने उत्पादन पर्यायाने उत्पन्नही कमी होते. हे चित्र बदलायचे असे ठरवून विक्रमने चार किलोमीटर अंतरावरील उरमोडी नदीवरून पाइपलाइन करून पाण्याची सोय प्रथम केली. गावामध्ये आले हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांबरोबर त्याने सुरवातीला आल्याची शेती केली. या शेतीसाठी चुलते यशवंत साळुंखे यांचे चांगले मार्गदर्शन मिळाल्याचे विक्रम यांनी सांगितले. तसेच शेतामध्ये पेरूची तीन एकर जुनी बाग होती. मात्र तिच्यापासून वार्षिक उत्पादन एकरी अवघे चार टन आणि उत्पन्न चाळीस हजार रुपये मिळत असे. बाग जुनी असल्याने त्यात आंतरपीकही घेता येणे शक्‍य नव्हते. विक्रमने ती पेरूची बाग काढून टाकली.

मिडो ऑर्चर्ड लागवड पद्धतीचा अवलंब
पूर्वीची बाग काढून त्या जागी पुन्हा पेरूची लागवड करताना अन्य लोकांच्या पेरूच्या बागा पाहिल्या. ते लोक कशा प्रकारे नियोजन करतात, याचा अभ्यास केला. त्यातून विक्रम यांना मिडो ऑर्चर्ड पद्धतीविषयी माहिती मिळाली. मिडो ऑर्चर्ड पद्धतीचा अवलंब भारतात प्रथम करणाऱ्या लखनौ येथील गोरखसिंग यांच्या बागेलाही भेट दिली. सरदार (लखनौ 49) या जातीची रोपेही त्याने लखनौ येथून आणली. त्या पेरू रोपांची लागवड मिडो ऑर्चर्ड पद्धतीने
ऑगस्ट 2009 मध्ये तीन एकर क्षेत्रावर केली. त्यात प्रति एकरी एक हजार झाडे याप्रमाणे तीन एकरांत तीन हजार रोपांची लागवड केली. लागवडीचे अंतर आठ फूट x पाच फूट ठेवले. सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. या साऱ्या धावपळीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

पेरू बागेसाठी पाणी व खत व्यवस्थापन पेरूची झाडे लहान असेपर्यंत एक दिवसा आड करून दहा लिटर पाणी दिले. त्यानंतर झाडे मोठी झाल्यावर एक दिवसाआड 20 ते 25 लिटर पाणी देण्याची व्यवस्था केली. झाडाची वर्षातून तीन वेळा छाटणी केली. जानेवारी, मे, ऑक्‍टोबर या महिन्यांत छाटणी केली. छाटणी करताना झाडाचा व्यास एक मीटर राहील यांची प्रामुख्याने काळजी घेतल्याचे विक्रमने सांगितले. पेरूच्या बागेत भुईमूग आणि कोबीचे आंतरपीक घेतले होते. त्याची काढणी झाल्यावर पॉवर टिलरच्या साहाय्याने शेत भुसभुशीत करून घेतले.

पेरूच्या बागेचे खत व्यवस्थापन करताना वर्षातून दोन वेळा वरखते दिली जातात. पेरूचा बहर धरण्यापूर्वी तीन एकरांत योग्य प्रमाणात सेंद्रिय खत, 18 पोती डीएपी, 12 पोती पोटॅश झाडास रिंग पद्धतीने खते दिली. तसेच वरखताबरोबर विद्राव्य खते ठिबकमधून दिली. विद्राव्य खतांमध्ये 13ः0ः45, 0ः 52 ः 34 ही खते तीन एकरांसाठी 75 किलो प्रत्येक बहराच्या वेळी दिली. तसेच प्रत्येक बहराच्यावेळी प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या. तसेच गरजेनुसार योग्य कीडनाशकांच्या व बुरशीनाशकाच्या फवारण्या घेण्यात आल्या.

जमा-खर्चाचा ताळेबंद तीन एकर क्षेत्रामध्ये - तीन हजार खड्डे घेण्यासाठी 15 हजार रुपये
- पेरूच्या रोपाचा खर्च - लखनौ येथून वाहतुकीसह प्रति रोप 35 रुपये प्रमाणे - एक लाख पाच हजार रुपये
- खते व कीडनाशके, मजुरी 15 हजार
- एकूण एक लाख 55 हजार रुपये खर्च आला.
- या खर्चामध्ये तीन एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचन यंत्रणा उभारणीचा खर्च 60 हजार रुपये धरलेला नाही.
- पहिल्या वर्षी पेरूच्या बागेसाठी अधिक प्रमाणात भांडवल लागते. त्यानंतर प्रतिवर्षी छाटणी, भांगलण, खते, फवारण्या यांसारख्या आंतरमशागतीसाठी तीन एकर क्षेत्रात सरासरी 45 हजारांपर्यंत खर्च येत असल्याचे विक्रम याने सांगितले.
पेरूचे उत्पादन
- पहिल्या वर्षी म्हणजे 2010 मध्ये पेरूच्या एका झाडापासून सात ते आठ किलो उत्पादन मिळाले. तीन हजार झाडांपासून सरासरी 22 टन उत्पादन मिळाले असून, सरासरी प्रतिकिलो दहा रु. दर मिळाला आहे. त्यातून दोन लाख 20 हजारांचे उत्पन्न मिळाले.
- दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2011 मध्ये पेरूच्या उत्पादनात वाढ होऊन प्रति झाडास सरासरी 12 किलोचे उत्पादन मिळाले आहे. तीन एकर क्षेत्रात तीन हजार झाडांचे 36 टन उत्पादन मिळाले. सरासरी प्रति किलोस दहा रुपये दराने तीन लाख 60 हजार रुपये मिळाले आहेत.

भुईमुगाचे आंतरपीक पेरूची झाडे सुरवातीस छोटी असल्याने दोन सरींतील आठ फूट अंतरामध्ये भुईमूग हे आंतरपीक घेतले. त्याने फेब्रुवारीत भुईमुगाची लागवड केली. त्यास भुईमुगाचे एकरी 20 क्विंटल उत्पादन याप्रमाणे तीन एकरात 60 क्विंटल भुईमुगाचे उत्पादन मिळाले. त्यातील 20 क्विंटल घरी ठेवून 40 क्विंटल भुईमूग शेंगांची विक्री केली. त्या शेंगांस प्रतिक्विंटल दोन हजार पाचशे रुपये असा भाव मिळाला. भुईमुगापासून त्यांना एक लाख रुपये मिळाले.

कोबीचे आंतरपीक विक्रमने भुईमूग पीक काढल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कोबी पिकाचे नियोजन केले. त्याने पेरूच्या दोन सरींमधील आठ फूट अंतरात दोन फुटांवर सरी सोडली. 2 x 2 अंतरावर अडीच हजार रोपांची लागवड केली. लागवडीनंतर त्याने 15 दिवसांनी डीएपीची बारा पोती, तर युरियाची तीन पोती मिश्रण करून रिंग पद्धतीने दिले. 20 दिवसांनी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर त्याने कीडनाशकाची फवारणी केली. नंतर 45 दिवसांनी डीएपीची बारा पोती, पोटॅश सहा पोती, युरिया तीन पोती खते दिली. तसेच गड्डा भरावा यासाठी बोरॉनची फवारणी दिली. दर आठ दिवसांनी पाण्याचे देण्याचे नियोजन केले. तणास दोन वेळा खुरपणी दिली. कोबीची ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात काढणी सुरू केली. तीन एकरांत 45 टन कोबीचे उत्पादन मिळाले. सरासरी प्रति दहा किलोस 150 रुपये दर मिळाला. त्यापासून सहा लाख 75 हजारांचे उत्पन्न मिळाले.

रोपास पंधरा हजार, मशागतीस बारा हजार चारशे, शेणखत व सेंद्रिय खतास 48 हजार रुपये, रासायनिक खतास पंधरा हजार, मजुरीसाठी 84 हजार 678, पॅकिंग बारा हजार, वाहतूक खर्च पंधरा हजार, विक्री व कमिशन 63 हजार असा एकूण खर्च दोन लाख 64 हजार 678 रुपये एवढा झाला. तीन एकरात खर्च वजा जाता चार लाख 10 हजार 214 रुपये नफा झाला. तसेच मिरचीचे आंतरपीक घेतले होते. त्यातून सुमारे 60 हजार रुपये मिळाले. पेरूतील आंतरपिकातून चांगले उत्पादन मिळाल्याने पेरूच्या लागवडीचा सुरवातीचा खर्च निघून आला. त्यामुळे शेती करण्याचा हुरूप वाढला.

प्रगतीत कुटुंबाचा मोठा आधार शेती हे एकट्याचे काम नाही. घरातील प्रत्येक सदस्याची त्यासाठी मोठी मदत होते. चुलत्याचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष शेतीमध्ये बंधू संजय साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे विक्रमने सांगितले.

पुरस्कार आणि पाठीवर थाप - शेतीतील विविध प्रयोगांबद्दल 26 जानेवारी 2012 रोजी "राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझर'चा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकांचा आदर्श शेतकरी हा पुरस्कार विक्रम साळुंखे यांना देण्यात आला आहे.
- पेरूच्या बागेचे नियोजन पाहण्यासाठी राज्यपाल के. शंकरनारायण, कृषी आयुक्त उमाकांत दागट, कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, जिल्हा पोलिस प्रमुख के. एम. प्रसन्ना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील आदी मान्यवरांनी त्याच्या शेतीस भेट दिली आहे. त्यांनी त्याच्या शेतीचे कौतुक केले आहे.
विक्रम साळुंखे, 9158019111

पेरूमध्ये मिडो ऑर्चर्ड पद्धतीसाठी लागवड करताना जमिनीचा प्रकार आणि हवामानाचा विचार करणे आवश्‍यक आहे. बाभळेश्‍वर येथे केलेल्या प्रयोगामध्ये पेरूतील लागवडीसाठी साडेसात x साडेसात फूट हे अंतर फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. मात्र 10 x 5 फूट हे ठेवल्यास आंतरमशागत यंत्राच्या साह्याने करणे सोपे होते. साधारणपणे तीन वर्षांनंतर पेरूच्या बागेपासून चांगल्या उत्पादनाला सुरवात होते.
- डॉ. भास्कर गायकवाड, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर, ता. राहाता, जि. नगर
संपर्क - 9822519260

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा