सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

ढोबळी मिरची

नाशिक जिल्ह्यात आडगाव चोथवा (ता. येवला) येथील खोकले कुटुंबीयांनी शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीची शेती करण्यास सुरवात केली आहे. लागवडीचे हे त्यांचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या दोन वर्षांत दराच्या बाबतीत हे पीक चांगले किफायतशीर ठरले. यंदा विक्री सुरू झाली असून दर घसरले आहेत. पुढील काळात ते वाढण्याची आशा आहे. मात्र कांदा, कपाशी, मका या पारंपरिक पिकांच्या तुलनेत अवर्षणग्रस्त भागासाठी शेडनेटमधील ढोबळी मिरचीचे पीक अधिक फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव खोकले यांनी व्यक्त केला आहे. संतोष विंचू
पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर झाला आहे. दुष्काळाच्या झळा अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत. मात्र, काळाची गरज ओळखून अनेक शेतकरी प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याकडे लक्ष देऊ लागले आहेत. विविध पिकांचे प्रयोग असोत किंवा नवे तंत्रज्ञान असो; त्या रूपाने शेतकरी यशाचा मार्ग शोधताना दुष्काळ, पाणीटंचाई या अडथळ्यांना दूर करण्याचा प्रयत्न करू लागला आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला हा कायम अवर्षणातच असलेला तालुका. याच तालुक्‍यात विविध शेतकऱ्यांनी नगदी पिकांचे प्रयोग यशस्वी केले आहेत. आडगाव चोथवा येथील शेतकरी श्‍यामराव खोकले, त्यांचा मुलगा डॉ. नारायण खोकले व कुटुंबीयांचे नाव आता या यादीत समाविष्ट झाले आहे. ढोबळी मिरचीच्या उत्पादनासाठी त्यांची ओळख होऊ लागली आहे. कांदा, कपाशी, मका ही या भागातील पारंपरिक पिके; मात्र त्यांतून फार काही हाती लागत नाही, या मानसिकतेतून खोकले शेडनेटमधील ढोबळी मिरचीकडे वळले.

या पिकाचे यंदाचे त्यांचे तिसरे वर्ष आहे. तालुक्‍याच्या दक्षिणेला असलेल्या आडगाव चोथवा भागातील शेतीवर नगर जिल्ह्याचा पगडा आहे. यातूनच डॉ. नारायण खोकले यांना 2009-10 मध्ये शेडनेटमध्ये शेती करण्याची संकल्पना सुचली. विविध प्रयोग पाहतानाच त्यांनी ढोबळी मिरचीची निवड केली. कृषी विभागाच्या सल्ल्याने लागवडीची तयारीही केली. तालुक्‍यातील हा त्यांचा दीड एकरावरचा पहिलाच प्रयोग होता, त्यामुळे स्वतःचा अनुभव शेतीला जोडताना जाणकारांचे मार्गदर्शनही घेतले. लाखो रुपयांचे भांडवल गुंतवताना यशाची खात्री कितपत, हा प्रश्‍न पुढे होता; मात्र वडील श्‍यामराव व बंधू दत्तात्रेय यांची मोलाची मदत त्यांना झाली.

अशी झाली तयारी -रोपे व लागवड वगळता शेडनेट, त्याचे स्ट्रक्‍चर व इतर यंत्रणा पहिल्या वर्षी उभारावी लागणार होती. ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी शेतीची नांगरट यांत्रिक पद्धतीने केली. लागवडीसाठी बेड तयार केले. या सर्व मशागतीसाठी त्यांना 50 हजारांपर्यंत खर्च आला. शेड ओढल्यानंतर ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी दीड लाख रुपये खर्च केला. 50 हजारांचे आठ हजार बांबू घेतले. सव्वा लाखाचे लोखंडी स्ट्रक्‍चर तयार करून साडेसात हजार चौरस मीटर नेट ढोबळी मिरचीसाठी तयार करण्यात आले. 30 रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे सव्वा दोन लाख खर्च नेटसाठी आला. संपूर्ण बेड प्रथम पाण्याने ओले करण्यात आल्यानंतर 15 दिवसांनी एक फूट बाय पाच फुटांवर दीड एकर क्षेत्रात सुमारे 17 हजार रोपांची लागवड केली. एका नर्सरीतून खासगी कंपनीच्या संकरित जातीची रोपे खरेदी केली. सात ते आठ रुपयांना एक रोप विकत घेतले. प्रत्येक बेडमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले. फवारणीसाठी 80 ते 90 हजार एकरी खर्च करण्यात आला. पहिल्या वर्षी एकूण साडेआठ लाख रुपयांचा खर्च उत्पादन निघेपर्यंत आला होता. या पिकात नवखे असूनही आत्मशक्तीच्या बळावर खोकले कुटुंबीयांनी पहिल्याच वर्षी सुमारे सात हजार 800 क्रेट मिरचीचे उत्पादन घेतले. प्रति क्रेट दहा किलोचा होता. या उत्पादनाच्या विक्रीतून सुमारे दहा लाख रुपये हाती आले. खर्च वजा जाता दीड लाख रुपये त्यांच्या हाती आले. मिरचीला प्रति क्रेट 125 ते 150 रुपयांपर्यंत दर मिळाला होता. पहिल्या वर्षी या पिकातून हुरूप आल्यानंतर 2010मध्ये जोमाने कामाला लागून उगाव येथून रोपे आणून लावली. शेडनेट, ठिबक होतेच; मात्र लागवड, मजुरी, खते, देखभाल, फवारणी, तोडणी यासाठी वर्षभरात दीड एकरात सुमारे सात ते आठ लाखांपर्यंत खर्च आला. सुमारे सात हजार क्रेट मिरची निघून त्यातून सुमारे 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न मिळाले सहा लाखांचे. अर्थात, या वर्षी प्रति क्रेट दर राहिले ते 250 ते 300 रुपयांप्रमाणे, म्हणजेच दहा किलोसाठीचे. मात्र, हे दर पूर्ण हंगामभर नसून काही काळासाठीचे होते.

यंदा भावाचा दगा! - पहिल्या दोन्ही वर्षांत खोकले यांची ढोबळी मिरची तालुक्‍यात चर्चेला आली. येवला, कोपरगाव, वैजापूर, लासलगाव, नाशिक, मुंबई, पुणे येथील बाजारात भाव खाणारी ही मिरची प्रति क्रेट 125 ते 190 रुपयांपर्यंत भाव मिळवत होती. खोकले यांनी मागील हंगामात ऑगस्टमध्ये लागवड केली होती. त्यापूर्वी त्यांनी उन्हाळी हंगाम पकडला होता. यंदाच्या वर्षी मात्र त्यांनी जुलैमध्ये रोपे लावली. अर्थात, हा काळ पावसाचा असला तरी येवला भागात मात्र मुळातच पर्जन्यमान कमी असल्याने पिकाचे नुकसान होणार नाही असा खोकले यांना अंदाज होता. आतापर्यंत सुमारे चार हजार क्रेट मालाची विक्री झाली आहे. नऊ महिने प्लॉट सुरू राहिल्यास अजून सुमारे तीन हजार क्रेटचे उत्पादन अपेक्षित आहे. मात्र यंदा अद्यापपर्यंत त्यांना सरासरी 75 ते 80 रुपये प्रति क्रेट भाव मिळत आहे. मात्र, बाजारभावात वाढ होण्याची अपेक्षा असून, चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याची आशा आहे. अजून मार्चपर्यंत त्यांची मिरची विक्रीला येणार आहे. त्या काळात दर वाढले तर हे पीक अधिक किफायतशीर ठरेल असे खोकले यांना वाटते. विशेष म्हणजे पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे पीक चांगल्या तऱ्हेने फुलवणे शक्‍य झाले आहे.

दरातील चढ- उताराबाबत खोकले म्हणाले, की आता पूर्वीच्या तुलनेत शेडनेट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
पाऊसमान व हवामानानुसार भाजीपाल्याची आवक- जावक यांचीही चढ- उतार जाणवते, त्याचा परिणाम दरांवर होतो.
नाशिक, कोपरगाव, येवला आदी ठिकाणी मालाची विक्री करीत आहोत. तुलनेने येवल्यातच अधिक दर मिळत आहे. पाण्यासाठी विहीर आहे, तसेच लिफ्ट इरिगेशन आहे.

शेटनेट शेती ठरतेय फायद्याची... ""शेड-नेटमध्ये पीक घेणे धाडसाचे वाटत असले तरी आम्ही पारंपरिक पिकांना फाटा देत 2009-10 मध्ये ढोबळी मिरची लागवड केली. दीड एकरात पहिल्या वर्षी मोठा खर्च आला; मात्र उत्पन्नही मिळाले. जाणकारांचा सल्ला, तसेच अवगत कौशल्य वापरून देखभाल, निगा, वेळीच फवारणी, खतांची मात्रा व पाणी देण्यासंदर्भात काळजी घेतली. सर्व कुटुंबीयांचे योगदान मिळाले. पहिल्या दोन्ही वर्षांत भाव समाधानकारक मिळाला. सध्याही दररोज शंभरावर क्रेट विक्रीला नेले जात आहेत; मात्र भाव खूपच कमी आहे. तीन वर्षांतील सरासरी उत्पन्न चांगले आहे, त्यामुळे हा प्रयोग पारंपरिक पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत यशस्वी वाटतो.''

डॉ. नारायण खोकले, दत्तात्रेय खोकले


संपर्क - डॉ. नारायण खोकले - 9423506628

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा