शनिवार, १ डिसेंबर, २०१२

"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका!

पुणे - राज्यभरातील शेतकऱ्यांना "सकाळ-ऍग्रोवन' कृषी प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाबरोबरच ट्रॅक्‍टर जिंकण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. "फोर्स मोटर्स'तर्फे प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांमधून एका भाग्यवान शेतकऱ्याची सोडतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यास "फोर्स'चा अत्याधुनिक बहुपयोगी ट्रॅक्‍टर भेट देण्यात येईल.

कृषी महाविद्यालयाच्या नवीन मैदानावर शनिवारी (ता. 1) सकाळी 11 वाजल्यापासून "ऍग्रोवन'चे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. प्रदर्शनासाठी 20 रुपये प्रवेशशुल्क आहे. प्रवेशशुल्क भरतानाच संबंधित शेतकऱ्यांना एक प्रवेशिका देण्यात येईल. शेतकऱ्यांनी या प्रवेशिकेवर आपला तिकीट क्रमांक लिहून प्रवेशिका पूर्ण भरणे आवश्‍यक आहे. पूर्ण भरलेल्या प्रवेशिकाच सोडतीसाठी पात्र ठरणार आहेत.

प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी (ता. 5) सायंकाळी सहा वाजता प्रदर्शनस्थळी जमा झालेल्या सर्व प्रवेशिकांमधून सोडतीद्वारे बक्षीस विजेत्याची निवड करण्यात येणार आहे. विजेत्याचे नाव "ऍग्रोवन'मधून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर विजेत्याला "फोर्स मोटर्स'मार्फत ट्रॅक्‍टरचे वितरण करण्यात येईल.

शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा "ऍग्रोवन'चा प्रयत्न आहे. यासाठी शेतकऱ्यांची सद्यःस्थिती, अडीअडचणी, अपेक्षा, मागण्या जाणून घेण्यासाठी प्रदर्शनात प्रवेश करतेवेळीच त्यांच्याकडून प्रवेशिका भरून घेण्यात येणार आहेत. अवघ्या पाच ते सात मिनिटांत सर्व माहिती भरता येईल, अशी प्रवेशिकेची रचना आहे. एका व्यक्तीने प्रदर्शन कालावधीत एकदाच ही प्रवेशिका भरायची आहे.

प्रवेशिकेत प्रदर्शन पाहणाऱ्या व्यक्तीची व शेतीची माहिती, समस्या, अडचणी, वापरत असलेल्या कृषी निविष्ठा, शासकीय योजना, त्यांना हवी असलेली माहिती व "ऍग्रोवन'कडून असलेल्या अपेक्षांचा समावेश आहे. या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना हवी असलेली माहिती देण्यासाठी व समस्या, अडचणी सोडविण्यासाठी "ऍग्रोवन'ला होणार आहे. त्यामुळे प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, उद्योजकांनी प्रवेशिका पूर्ण भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा