शनिवार, १ डिसेंबर, २०१२

अंजिर

कमी आवक असलेल्या हंगामातील खट्टा बहर घेऊन उत्तम गुणवत्तेच्या अंजिरांचे उत्पादन घेण्याचे धाडस करणारे तसे मोजकेच! पुणे जिल्ह्यातील निंबूत (ता. बारामती) येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश व संभाजी जगताप बंधू गेल्या सहा वर्षांपासून अंजिराचा खट्टा बहर यशस्वीपणे घेत आहेत. मीठा बहराप्रमाणेच खट्टाही गोड करता येतो, हेच त्यांनी यातून दाखवून दिले आहे. अमोल बिरारी
नीरा- मोरगाव रस्त्यावरील पठारावर जगताप बंधूंचे सुमारे पंधरा एकर क्षेत्र आहे. 1998 मध्ये त्यांनी हे पडीक माळरान विकत घेतले. उंच-सखल अशी ही जमीन अतिशय कष्टातून सपाट केली. मशागतीतून जमिनीचा पोत सुधारला. आज या जमिनीचे नंदनवन झाले असून, यात अंजिरासह विविध फळबागा दिमाखाने उभ्या आहेत.

पूर्वी जगताप बंधूंकडे वडिलोपार्जित चार एकर शेती होती. त्यात ऊस आणि भाजीपाला होत होता. दोघेही भाऊ पदवीधर असून, एकत्रित कुटुंब आहे. पंधरा एकर पडीक जमीन विकत घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने जमिनीची सुधारणा केली. माती परीक्षण करून जमीन फळपिकांसाठी योग्य असल्याने या पिकांना प्राधान्यक्रम दिला. पिकांचे व्यवस्थापन चोख ठेवले. बाजारपेठेचा अभ्यास करून कोणत्या महिन्यात कुठल्या फळांची आवक कमी- जास्त असते, त्यानुसार बहराचे नियोजन ठेवले. बहुतेक अंजीर उत्पादक मीठा बहर घेतात; परंतु जगताप यांनी पहिल्यापासूनच खट्टा बहर घेण्याचे नियोजन ठेवले. त्याप्रमाणे सहा वर्षांपासून त्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे.

दोन एकरांवर "दिनकर' जातीच्या अंजिराची सुमारे चारशे झाडे आहेत. सन 2004 ते 2006 या काळात थोड्या- थोड्या क्षेत्रावर 15 x 15 फूट अंतरावर लागवडीचे नियोजन केले. मीठा बहरापेक्षा खट्टा बहराचे सरासरी उत्पादन कमी असले तरी मालाची आवक कमी असल्याने अधिक दर मिळतो. खट्टा बहराची फळे चवीला कमी गोड असतात, हा समजही जगताप बंधूंनी खोटा ठरवला आहे.

खट्टा बहर व्यवस्थापनाचे तंत्र - मे महिन्यात बागेला पाण्याचा ताण दिला जाऊन महिन्याच्या अखेरीस छाटणी उरकली जाते. भरपूर फुटवे व चांगली फळे येण्यासाठी तसेच बहर उशिरा हवा की लवकर हे ठरवून छाटणी होते. त्यानंतर रान तयार करण्याची कामे होतात. यात मातीची चाळणी करून जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश यांच्या मात्रेबरोबर शेणखत, गांडूळ खत, निंबोळीपेंड मिसळली जाते. प्रति झाड एक घमेले शेणखत, अर्धा किलो निंबोळी पेंड, डीएपी किंवा पोटॅश अर्धा किलो (10-26-26 असल्यास एक किलो), तसेच दुय्यम अन्नद्रव्ये 200 ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्ये 100 ग्रॅम आणि युरिया 100 ग्रॅम प्रति झाड यांची पहिली मात्रा छाटणी कालावधीत दिली जाते. जूनमध्ये बागेला पाणी सोडण्यात येते.

खते, पाण्याचे नियोजन - ठिबक आणि मोकाट अशा दोन्ही पद्धतीने (परिस्थितीनुसार) बागेला पाणी दिले जाते. विद्राव्य खते ठिबकमधून देतात. जगताप म्हणाले, की या बहराला हवामान बदलानुसार खते द्यावी लागतात. जमिनीतून दिली जाणारी खते मातीत एकजीव केली जातात. पाणी सोडल्यानंतर एक महिन्याने पुन्हा शंभर ग्रॅम युरिया प्रति झाड दिला जातो. युरिया अतिरिक्त झाला तर पाने लवचिक होतात. पाने कडक राहणे आवश्‍यक असते, जेणेकरून रोग- किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. खताची दुसरी मात्रा दोन महिन्यांनी पहिल्या मात्रेच्या प्रमाणात देतात. ही मात्रा न दिल्यास अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते.

वेळच्या वेळी फवारणी आवश्‍यक जगताप म्हणाले, की खट्टा बहरात कीडनाशकांच्या फवारणीला अतिशय महत्त्व आहे, कारण हा बहर पावसाळी हंगामात येतो. वातावरण ढगाळ, पावसाळी असते. रोग- किडींचे प्रमाण वाढलेले असते. वेळच्या वेळी फवारणी केली नाही तर नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेऊनच बहर नियोजन होते. फळमाशी थोड्या प्रमाणात आढळते, त्यासाठी सापळे लावून नियंत्रण केले जाते.

तांबेऱ्याचा असतो अधिक धोका - पावसाळी, ढगाळ वातावरणात तांबेरा रोगाची दाट शक्‍यता असते. नियंत्रणासाठी मॅन्कोझेबच्या गरजेनुसार फवारण्या होतात. पाच- सहा- आठ पानांवर फुटवे आल्यानंतर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसू लागतो. किडी- रोगांच्या नियंत्रणासाठी एकत्रितपणे कार्बेन्डाझिम, इमिडाक्‍लोप्रीड आणि सोबत 19ः19ः19 यांची फवारणी होते. फुलकिडींच्या नियंत्रणासाठी क्‍लोरपायरिफॉसचा वापर होतो. एका महिन्यात साधारण चार फवारण्या घेतल्या जातात.

घरच्या सदस्यांचेही श्रमदान छाटणीनंतर सुमारे चार महिन्यांनी फळे तोडणीस येतात. तोडणी रोज तसेच सकाळी लवकर करणे आवश्‍यक असते. याकामी घरातील सर्व सदस्यांची मदत होते, त्यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होऊन नफ्याचे प्रमाण वाढते. तोडणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने घरच्या सदस्यांचे सहकार्य मोलाचे ठरते, असे जगताप म्हणाले.

खर्चामध्ये शेणखत, रासायनिक खते, फवारणी आदी मिळून एकरी पन्नास हजार रुपये खर्च होतो. छाटणी, तोडणीची कामे घरीच असल्याने तो खर्च गृहीत धरलेला नाही.

खट्टाचे उत्पादन, उत्पन्न - खट्टा बहरात दरवर्षी प्रति झाड सुमारे 40 किलो फळे मिळतात. ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्यान बाजारात अंजिराची फारशी आवक नसते, त्यामुळे फळांना प्रति किलो 50 ते 60 रुपये दर मिळतो, तुलनेने मीठा बहरात आवक वाढल्याने 10 ते 20 रुपये प्रति किलो दर मिळतो. योग्य व्यवस्थापनामुळे गुणवत्तापूर्ण फळांना स्थानिक नीरा बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून भरपूर मागणी मिळते. फळांची प्रतवारी तीन प्रकारांत होते. टोपलीत भरून ती बाजारपेठेत पाठविली जातात. प्रति झाड दोनशे ते अडीचशे रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता एकरी सुमारे अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.

अन्य फळशेती दृष्टिक्षेपात -जगताप यांच्याकडे अर्धा एकर लखनौ सरदार पेरू, दोन एकर भगवा डाळिंब, सव्वा एकर पुरंदर सिलेक्‍शन सीताफळ, एक एकर संत्री, एक एकर लिंबू, अर्धा एकर कालीपत्ती चिकूची बाग आहे. एका क्षेत्रातील विहिरीतून तसेच कॅनॉलमधून लिफ्ट इरिगेशन केले आहे.

फळझाड छाटणी वेळापत्रक - वर्षभर बाजारपेठेत आपली फळे कमी आवक असलेल्या कालावधीत जातील अशापद्धतीने जगताप बंधूंनी प्रत्येक फळपिकाच्या छाटणीचे वेळापत्रक तयार केले आहे. ते असे -

फळझाड-------------छाटणी---------------------- बाजारात पाठविण्याचा कालावधी
.........................................................................................................
अंजीर---------------मेमध्ये---------------------- - ऑक्‍टोबर- नोव्हेंबर
पेरू------- - दोन छाटण्या, जूनअखेर, जानेवारीत--------- जूनमध्ये
डाळिंब----------- डिसेंबरअखेर------------------------- जुलै- ऑगस्ट
सीताफळ------------ फेब्रुवारीअखेर---------------------- ऑगस्ट- सप्टेंबर
लिंबू------------- मेअखेर पाणी दिले जाते, जून-ऑगस्ट पाणी बंद------ फेब्रु- मार्च
संत्री----------- मृग बहर-------------------------------- फेब्रुवारी- मार्च

खट्टा बहरात हवामान बदल, पावसाळी वातावरण, फवारण्यांचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. या सर्वांचे व्यवस्थापन योग्य केल्यास खट्टा बहर नफ्याचा ठरू शकतो. यामध्ये बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ, कृषी सहायक पी. जी. शिंदे, अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विकास खैरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते.
- जगताप बंधू

""सुमारे 70 टक्के शेतकरी मीठा, तर 25 ते 30 टक्केच खट्टा बहर घेतात. पाणी, खते, कीड- रोग नियंत्रणाचे व्यवस्थित नियोजन केले तर खट्टा बहर फायदेशीर ठरतो. यात जगताप यांचे नियोजन चोख असून वेळोवेळी ते माती, पाने, पाणी परीक्षण करून घेतात. दूरध्वनीवरून नियमित संपर्कात असतात.''
- विवेक भोईटे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती

संपर्क - सुरेश जगताप, 9922678963

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा