सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

मिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
 
हिंगोली - सेनगाव तालुक्‍यातील पार्डी पोहकर गावातील अभिनव शेतकरी मंडळाच्या चौदा शेतकऱ्यांनी गटशेती व शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेडनेटमध्ये मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यातून अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 33 लाख 60 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.
सेनगाव तालुका अवर्षणप्रवण

सेनगाव तालुका हा अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. या भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात.
अभिनव शेतकरी मंडळाची स्थापना
गावात नाबार्ड व आयडीबीआय बॅंकेच्या पुढाकाराने अभिनव शेतकरी मंडळ स्थापन झाले. यामध्ये सुभाष पोहकर, शंकर जाधव, माणिक भिसडे, प्रभाकर भिसडे, रमेश पोहकर, रामा पोहकर, वामन पोहकर, गजानन पोहकर, उत्तम पोहकर, ज्ञानेश्‍वर पोहकर, धारराव पोहकर, शंकर पोहकर, त्र्यंबक झाडे, रामचंद्र झाडे, विश्‍वनाथ पोहकर, माधव पोहकर, प्रकाश पोहकर, साहेबराव पोहकर, भगवान गोटे, नामदेव पोहकर, शकुंतलाबाई मुंदडा यांचा समावेश आहे.
फुलविक्रीचा यशस्वी प्रयोग
अभिनव शेतकरी मंडळातील शेतकऱ्यांनी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विंधन विहिरी घेतल्या; मात्र विहिरीला कमी पाणी लागल्याने त्यांनी दरवर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादन सुरू केले. मागील काही वर्षांत येथील अनेक शेतकरी गटशेती पद्धतीने दरवर्षी झेंडूच्या फुलशेतीतून चार महिन्यांत सुमारे पन्नास ते पचावन्न लाखांचा नफा मिळवत आहेत.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
शेतकऱ्यांची नवीन प्रयोगाची तळमळ लक्षात घेऊन, नाबार्डचे प्रल्हाद जोशी, आयडीबीआय बॅंकेचे अधिकारी अरुण कवाळे यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. यासोबतच जिल्हा कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी मार्गदर्शन केले.
फलोत्पादन अभियानातून उभारले शेडनेट
अभिनव शेतकरी मंडळाने गटशेतीच्या माध्यमातून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट उभारून मिरचीचे बीजोत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आयडीबीआय बॅंकेने या शेतकऱ्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे कर्ज दिले, तर कृषी खात्याने त्यांना सुमारे सव्वा लाख रुपयांचे अनुदान देऊ केले आहे. त्यातून 21 शेतकऱ्यांनी दहा गुंठे जमिनीवर मे 2010 मध्ये शेडनेडची उभारणी केली.
देऊळगावच्या कंपनीशी झाला करार
एकवीसपैकी चौदा शेतकऱ्यांनी देऊळगाव राजा येथील अनुराधा सीडस्‌ कंपनीसोबत मिरची बीजोत्पादनाचा करार केला आहे. त्यानुसार कंपनीने शेतकऱ्यांना मिरचीचे बियाणे पुरविले; तर उत्पादित केलेले बियाणे साडेतीन हजार रुपये किलोप्रमाणे कंपनीच खरेदी करणार आहे.
रोपांची लागवड
2009 वर्षातील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेडनेटमध्ये साडेतीन फुटांवर बेड पद्धतीने मिरचीच्या रोपांची लागवड करण्यात आली. त्यानंतर या रोपांना वेळोवेळी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी, विद्राव्य खताची मात्रा देण्यात आली. याशिवाय वेळोवेळी फवारण्याही करण्यात आल्या. तसेच फुले आल्यानंतर त्यांचे क्रॉसिंग करून घेतले. यासाठी मजुरांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून गावातील मजुरांनाच क्रॉंसिंगबाबतची आवश्‍यक माहिती देण्यात आली.
साठ किलो बियाणांचे उत्पादन
दहा गुंठे जमिनीवर लावलेल्या मिरचीतून प्रत्येक शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात एकूण साठ किलो मिरची बियाणांचे उत्पादन घेतले आहे. बियाणे काढणीसाठी कंपनीकडून विशेष यंत्रही पुरविण्यात आले आहे. हे सर्व बियाणे अनुराधा सीडस कंपनीला देण्यात आले असून, कंपनीनेही शेतकऱ्यांचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्यामुळे चार हजार रुपयांचा भाव दिला आहे.
दहा गुंठ्यांत 2 लाख 40 हजारांचे उत्पादन
शेतकरी मंडळाच्या चौदा शेतकऱ्यांनी साठ किलो मिरचीचे बीजोत्पादन घेतले आहे. त्यामध्ये एका शेतकऱ्याने एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यातून लागवड, क्रॉसिंग, काढणीचा सर्व खर्च एक लाख रुपये वजा जाता प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे कंपनीने बियाणे नेण्याची व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च करावा लागला नाही.
गटशेतीचे महत्त्व पटले पाहिजे - मधुकर पन्हाळे
गटशेतीच्या माध्यमातून अत्यंत चांगले प्रयोग करून कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येते, हे पार्डीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.
शेतकरी मंडळ बीजोत्पादनात उतरणार - सुभाष पोहकर
गटशेतीच्या माध्यमातून अवर्षणप्रवण क्षेत्रातही बीजोत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. इतर शेतकरीही आणखी दोन शेडनेटची उभारणी करीत असल्यामुळे यापुढे टमाटे, वांगे, मिरची, सिमला मिरची, दुधी भोपळ्याचे बीजोत्पादन घेण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा