शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

विस्कळित पावसामुळे कांद्याची टंचाई

Saturday, August 04, 2012 AT 01:15 AM

नवी दिल्ली - अपुऱ्या व विस्कळित पावसामुळे देशात कांद्याचा प्रचंड तुटवडा जाणवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र व गुजरात या कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात यंदा सुमारे 50 टक्के घट दिसून आली आहे. यामुळे ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात देशांतर्गत बाजारपेठांत होणारी कांद्याची आवक रोडावणार आहे. दिल्लीत सध्या कांद्याचा भाव 10 ते 15 रुपये किलो असून दिल्लीसह देशाच्या अन्य भागांतही कांद्याचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

यंदा नाशिकमधील कांदा लागवडीच्या क्षेत्रात 50 टक्के घट झाली आहे. हीच परिस्थिती गुजरातच्या कांदा उत्पादक पट्ट्यातही आहे, अशी माहिती नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च डेव्हलपमेंट फाउंडेशनचे (एनएचआरडीएफ) संचालक आर. पी. गुप्ता यांनी दिली आहे. खरीप हंगामाच्या कांद्याच्या पेरण्या 15 जुलैपासून सुरू झाल्या असून त्या 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. पावसाच्या प्रमाणात सुधारणा झाल्यास डिसेंबरमध्ये तयार होणाऱ्या कांद्याच्या पिकात वाढ होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

गुप्ता म्हणाले, ""ऑक्‍टोबरपर्यंतची देशाची गरज भागवण्यासाठी पुरेसा कांद्याचा साठा आहे; परंतु त्यानंतर मात्र कांद्याची टंचाई भासण्याची शक्‍यता आहे. देशाच्या गोदामांतून सुमारे 18 लाख टन कांद्याची साठवणूक करण्यात आली आहे. दर महिन्याला देशातील जनतेला 3 ते 4 लाख टन कांदा लागतो. याव्यतिरिक्त काही टन कांदा निर्यात केला जातो. पावसाचे प्रमाण विस्कळित असल्यामुळे यंदा नाशिक भागातील काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबिन व अन्य धान्ये पेरली आहेत, असे पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलिप राव यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत कांद्याच्या निर्यातीत 32 हजार टनांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या काळात देशातून 4 लाख 61 हजार 854 टन कांद्याची निर्यात झाली आहे. कांद्याची निर्यात मुख्यतः आखाती देश, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि अतिपूर्वेकडील काही देश येथे केली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा