मंगळवार, २४ जुलै, २०१२

पावसाळी परिस्थितीचा वेलीमधील संजीवकांवर होतो परिणाम

जमिनीत ज्या भागात मुळ्यांची वाढ होते, त्या भागात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे माती संपृक्त होते. अशी परिस्थिती एक महिना राहिल्यास जमिनी पाणथळ होतात. अशा परिस्थितीमुळे द्राक्ष वेलींच्या वाढीवर परिणाम होतो. अ) दलदलयुक्त परिस्थितीचा "आयएए'वर होणारा परिणाम - तुलनात्मक दृष्टीने पाहिल्यास ऑक्‍झिनवर होणाऱ्या परिणामांची फार थोडी माहिती उपलब्ध आहे. सर्वसामान्यपणे दलदलयुक्त परिस्थितीत शेंड्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढते, तर मुळांमध्ये कमी होते. या परिस्थितीमध्ये वेलींमध्ये ताण निर्माण झाल्यामुळे अबसेसिक ऍसिडची (ABA) निर्मिती वाढते. अबसेसिक ऍसिडमुळे वेलीत होणारे "आएए'चे वहन थांबते. ब) दलदलयुक्त परिस्थितीचा सायटोकायनिनवर होणारा परिणाम - विविध प्रकाराच्या मुळांवरील ताणांमुळे वेलीतील संजीवकांच्या पातळीत तसेच वहनावर परिणाम दिसून येतो. सायटोकायनिन या संजीवकाची निर्मिती मुळांमध्ये होऊन ते जलवाहिनीद्वारे (Xylem) पानांपर्यंत वाहून नेले जाते. म्हणून जेव्हा दलदलयुक्त परिस्थिती निर्माण होते आणि ऑक्‍सिजनची कमतरता निर्माण होते, अशा परिस्थितीत वेलींमधील सायटोकायनिन निर्मिती व वहनावर परिणाम होतो. तसेच पर्णरंध्रामध्ये प्रतिरोध वाढतो, त्यामुळे पानांची वाढ लगेचच थांबते. क) दलदलयुक्त परिस्थितीचा "जीए'वर होणारा परिणाम - दलदलयुक्त परिस्थितीचा जीएवर फारसा परिणाम दिसत नसला तरी जीए-1 व जीए-3 यांच्या वेलीतील प्रमाणात घट संभवते; परंतु याचा वेलीतील चयापचय क्रियेवर फारसा प्रभाव दिसून येत नाही. ड) दलदलयुक्त परिस्थितीचा "एबीए"वर होणारा परिणाम - प्रामुख्याने वेलीवर ताण असेल तर पर्णरंध्रांच्या क्रियेवर नियंत्रण ठेवणे हे एबीएचे कार्य मानले जाते. जर एबीएची निर्मिती वाढली तर पर्णरंध्रे बंद होतात व बाष्पीभवनाचा वेग मंदावतो किंवा थांबतो. इ) दलदलयुक्त परिस्थितीचा इथिलिनवर होणारा परिणाम - बहुधा दलदलयुक्त परिस्थितीत इथिलिनचे वेलीतील प्रमाण वाढते. हे सर्व जमिनीच्या वर जो वेलीचा भाग असतो तेथे ------- येते. दलदलीमुळे जमिनीतील वायुविजन होत नाही, म्हणजेच मुळांना ऑक्‍सिजन मिळत नाही. अशा स्थितीत इथिलिन वेलीच्या मुळांमध्ये जमा होते आणि नंतर वेलीच्या सर्व भागांमध्ये पोचते. तसेच दलदलयुक्त मातीमध्येही इथिलिन निर्मिती होते. असे असले तरी वेलीत निर्माण होणारे इथिलिन व मातीमध्ये निर्माण होणारे इथिलिन यांच्यात संयुक्तपणे कार्य दिसून येत नाही. इथिलिन हे पाण्यात कमी प्रमाणात विरघळते (विद्राव्य) आहे. म्हणून दलदलयुक्त परिस्थितीमध्ये वेलीतील उतीमध्ये इथिलिनचे प्रमाण वाढते. इथिलिनच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तंतू मुळांची निर्मिती वाढते. तंतू मुळांची निर्मिती जरी आयएएच्या वाढणाऱ्या प्रमाणावर अवलंबून असली तरी इथिलिनमुळेच वेलीतील उती या आयएएला संवेदनशील बनतात, तंतू मुळे निर्माण होतात. उपाययोजना - 1) द्राक्ष बागेची लागवड शक्‍यतोवर उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीत करावी. 2) जर जमीन कमी निचऱ्याची असेल तर वेलीच्या ओळीमध्ये दोन ते तीन फूट खोलीचा चर घ्यावा, या चरातून बागेतील पाणी बाहेर काढावे. 3) ज्या बागेमध्ये जास्त प्रमाणात दलदल होते अशा बागेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्लॅस्टिक पेपरचे जमिनीवर आच्छादन करावे, पावसाचे पाणी बागेबाहेर काढावे. 4) दलदलीच्या परिस्थितीत मशागतीची कामे जास्त प्रमाणात करू नये. कारण मशागतीमुळे जमीन घट्ट होते व जमिनीतील वायुविजन थांबते. तसेच मुळांची वाढ थांबते. त्यामुळे वेलीची वाढ थांबून वेलीत अन्नद्रव्याची कमतरता होऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा