मंगळवार, १७ जुलै, २०१२

आधुनिक तंत्रातून गव्हाचे एकरी 25 क्विंटल उत्पादन

कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रकल्प व त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर त्याचे यशस्वी फलित काय असू शकते याचे उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यात राबविलेल्या गहू प्रकल्पाचे देता येईल. या प्रकल्पात शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मिळाले. बहुतांश शेतकऱ्यांनी उद्दिष्ट उत्पादनाचा आकडा सहज पार करून चांगली उत्पादनवाढ साधली. खरीप हंगामातही अशा प्रकारचे प्रकल्प पथदर्शक ठरणार आहेत. डॉ. कल्याण देवळाणकर, डॉ. प्रमोद रसाळ, बाळासाहेब रोमाडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 2011-12 मधील रब्बी हंगामात गहू उत्पादकांसाठी एक प्रकल्प राबवण्यात आला. त्यामध्ये निफाड तालुक्‍यातील वऱ्हेदारणा येथील 50 व लालपाडी येथील 25 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर गव्हाच्या अनुक्रमे एनआयएडब्ल्यू- 917 (तपोवन) व एनआयडब्ल्यू-34 या वाणांची लागवड करण्यात आली. ...असा घडला प्रकल्प प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांची निवड करणे, पीक प्रात्यक्षिकांबाबत नियोजन तसेच गहू लागवड तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन करण्यासाठी एकूण तीन बैठका झाल्या. त्यामध्ये निफाडच्या कृषी संशोधन केंद्रातील गहू विशेषज्ञ डॉ. प्रमोद रसाळ, गहू कृषी विद्यावेत्ता डॉ. कल्याण देवळाणकर यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण तंत्रज्ञान छापील स्वरूपात प्रत्येक शेतकऱ्यास हस्तांतरित करण्यात आले. वऱ्हेदारणा येथील शेतकऱ्यांना 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान (बागायत वेळेवर पेरणी) तपोवन या वाणाची लागवण करण्यासाठी सुचविण्यात आले. तसेच लालपाडी येथील शेतकऱ्यांना एनआयडब्ल्यू-34 या वाणाची लागवड 15 ते 30 डिसेंबर दरम्यान (बागायत उशिरा पेरणी) करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले. निविष्ठा वाटप : पेरणीअगोदर शेतकऱ्यांना गहू बियाणे, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, बीजप्रक्रियेसाठी फुले ऍझोटोबॅक्‍टर, फुले पीएसबी (स्फुरद विरघळविणारे जिवाणू), तसेच तणनाशके, कीडनाशके, पीक पोषणासाठी पोटॅशिअम नायट्रेट आदींचे वाटप करण्यात आले. प्रक्षेत्र भेट व प्रशिक्षण पेरणी ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतांना प्रत्यक्ष भेटी देऊन तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. फेब्रुवारीमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञ डॉ. गॉर्डन सिसार, डॉ. रॉबर्ट कार्क तसेच बिल आणि मेलिंडा गेट्‌स फाउंडेशनच्या 24 प्रशिक्षणार्थींनी प्रात्यक्षिक प्रक्षेत्रास भेट दिली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वऱ्हेदारणा येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यात एकूण 75 शेतकऱ्यांना कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी आणि कृषी विभागाच्या वतीने तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. निफाड येथेही अधिकारी-कर्मचाऱ्यांना शास्त्रज्ञांनी गहू लागवड विषयाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. निफाडच्या कृषी संशोधन केंद्रात विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुभाष मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत मार्चमध्ये शेतकरी मेळावा व शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सुमारे 500 शेतकरी या वेळी उपस्थित होते. प्रकाशनांमधून जागृती निफाडच्या केंद्रातून 1932 ते 2011 या कालावधीत प्रसारित करण्यात आलेले एकूण 25 विविध गव्हाचे वाण व शिफारशी याबाबत विविध प्रकाशने प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये गव्हाचे विकसित वाण व शिफारशी (पुस्तिका), गहू लागवड तंत्रज्ञान (पुस्तिका) व गव्हाचे नवीन वाण (घडीपत्रिका) यांचा समावेश होता. गव्हाचे भरघोस उत्पादन प्रकल्प राबविताना निश्‍चित केलेल्या दोन वाणांचे एकरी 18 क्विंटल उत्पादन मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात तपोवन वाणाचे 30 शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 क्विंटल तर 20 शेतकऱ्यांना 21 ते 23.5 क्विंटल दरम्यान उत्पादन मिळाले. वऱ्हेदारणा येथील शेतकरी संजय गामणे यांना तपोवन वाणाचे एकरी कमाल 23.5 क्विंटल उत्पादन मिळाले. एनआयएडब्ल्यू-34 वाणाचे लालपाडी येथील सात शेतकऱ्यांना 18 ते 20 क्विंटल, 18 शेतकऱ्यांना 21 ते 25 क्विंटल आणि सीताराम घुगे यांना एकरी 30 क्विंटल उत्पादन मिळाले. तंत्रज्ञानाचा तंतोतंत अवलंब आणि शास्त्रज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन यामुळे वऱ्हेदारणा आणि लालपाडी या गावातील एकूण 75 शेतकऱ्यांनी 2011-12 मधील रब्बीत गव्हाचे भरघोस उत्पादन मिळविले. आधुनिक गहू उत्पादन तंत्र प्रकल्पाची वैशिष्ट्ये : 1) प्रकल्पातील सर्व शेतकऱ्यांना गहू लागवडीसाठी आवश्‍यक सर्व निविष्ठा शिफारस केलेल्या प्रमाणात हंगामाच्या सुरवातीला उपलब्ध करून दिल्या. 2) हंगामापूर्वी बैठका घेऊन शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञान समजावून दिले. प्रत्येक शेतकऱ्याला ते छापील स्वरूपात हस्तांतरित केले. 3) हंगामादरम्यान शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेऊन आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रवृत्त केले. 4) शास्त्रज्ञांनी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या प्रात्यक्षिक क्षेत्रास वेळोवेळी भेटी देऊन त्यांच्या समस्यांचे जागीच निराकरण केले. 5) एकत्रित प्रयत्नांमुळे प्रकल्पातील शेतकऱ्यांनी एनआयएडब्ल्यू-34 चे एकरी कमाल 30 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा