सोमवार, २५ जून, २०१२

तंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे

शक्‍यतोवर लवकर पक्व होणाऱ्या बीटी कपाशीच्या संकरित वाणाची निवड करावी. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात येणाऱ्या पाण्याच्या ताणाचा फटका त्यास जाणवणार नाही. जून महिन्यात पाण्याची उणीव भासत असल्याने 60-75 मि.मी. पाऊस झाल्यावरच बीटी कपाशीची लागवड करावी. पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संधारण केल्यास पीक वाढीला फायदा होतो. डॉ. आर. बी. सिंघनधुपे, डॉ. अर्जुन तायडे बीटी कपाशीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी मध्यम ते भारी, उत्तम निचरा असणारी काळी जमीन निवडावी. काळ्या जमिनीमध्ये तीन वर्षांतून एक वेळा खोल नांगरणी करावी. कुळवाच्या दोन आडव्या-उभ्या पाळ्या देऊन शेत पेरणीयोग्य करावे. हलक्‍या जमिनीत बीटी कपाशीची लागवड शक्‍यतोवर टाळावी. भारतीय हवामान खात्याने 16 एप्रिल 2012 रोजी सरासरी मॉन्सून पावसाच्या 50 वर्षांच्या आकडेवारीवरून जून ते सप्टेंबर 2012 महिन्यात पाऊस सामान्य असण्याचा अंदाज वर्तविला आहे. बीटी कपाशीची लागवड पावसावर अवलंबून असल्याने हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस न झाल्यास शेतात मूलस्थानी जलसंधारण करणे महत्त्वाचे ठरते. दीर्घकालीन पर्जन्यमान आणि पिकांची पाण्याची गरज निरीक्षणाच्या आधारे असे आढळून आले आहे, की कापसाची लागवड करण्यास येणाऱ्या विदर्भातील आठ जिल्ह्यांतील पिकास पाण्याची बरीच उणीव भासते. पिकास जून आणि ऑगस्ट महिन्यात पाण्याची उणीव अनुक्रमे 14.0 ते 63.1 आणि 82.4 ते 94.5 मि.मी. असते. पिकास जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनुक्रमे 78.2 ते 264.3, 75.1 ते 250.8 आणि 12.5 ते 84.8 मि.मी. पाऊस पिकाच्या गरजेपेक्षा जास्त असतो. ऑक्‍टोबर महिन्यात जेव्हा बीटी कपाशी बोंड भरण्याच्या अवस्थेत असते, तेव्हा पाण्याची जास्त गरज भासते. परंतु हलक्‍या जमिनीतून जलद गतीने होणाऱ्या पाण्याचा ऱ्हासामुळे उत्पादनात घट होते. पावसाची मोठी उघडीप पडल्यास किंवा अवर्षण काळात मॉन्सून निघून गेल्यावर बीटी कपाशीची पाण्याची गरज भागविणे गरजेचे असते. त्यासाठी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पडणाऱ्या पावसाचे जमिनीच्या मूलस्थानी संधारण करणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता खोल नांगरट, उतारास आडवी पेरणी (कंटूरवर लागवड), सरी वरंबा पद्धती, रुंद गादीवाफा पद्धती आणि डवऱ्याच्या फासास दोरी बांधून सऱ्या पाडणे आदींचा अवलंब करावा. शक्‍यतोवर लवकर पक्व होणाऱ्या बीटी कपाशीच्या संकरित वाणाची निवड करावी. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात येणाऱ्या पाण्याच्या ताणाचा फटका त्यास जाणवणार नाही. जून महिन्यात पाण्याची उणीव भासत असल्याने 60-75 मि.मी. पाऊस झाल्यावरच बीटी कपाशीची लागवड करावी. लागवडीचे तंत्र कपाशीची वेळेवर लागवड करणे केव्हाही फायद्याची ठरते. परंतु बियाणे महाग असल्यामुळे सर्वसाधारणपणे 60-75 मि.मी. पाऊस झाल्यावर ही लागवड करावी. बीटी कपाशीची कायिक वाढ जास्त होत नसल्यामुळे आणि लवकर पात्या, बोंडे लागल्यामुळे त्याची लागवड 90 सें.मी. x 60 सें.मी. अंतरावर करावी. यामुळे हेक्‍टरी 18,500 झाडे राहतील. नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे लागवडीचे अंतर आणि एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रात्यक्षिकांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नांदुरा आणि लोणी गावातील शेतकऱ्यांना हेक्‍टरी 23.50 क्विंटल कपाशीचे उत्पादन मिळाले होते. या प्रात्यक्षिकांमध्ये 75 सें.मी. x 60 सें.मी. अंतरावर बीटी कपाशीची लागवड करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यामुळे अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत बीटी कपाशीचे उत्पादन वाढले. जास्त उत्पादनक्षमता असणाऱ्या, लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड विदर्भातील भागात करणे गरजेचे आहे. कारण ऑक्‍टोबर महिन्यात येणाऱ्या पावसाच्या ताणामुळे उत्पादनात घट होणार नाही. अलीकडे बाजारात संकरित बीटी कपाशीचे विविध उपलब्ध असून त्यापैकी चांगले उत्पादन देणाऱ्या दोन ते तीन वाणांची निवड करावी. अन्नद्रव्ये व्यवस्थापन : लागवडीच्या वेळेस प्रति हेक्‍टर 300 किलो 20:20:0 (प्रति एकरी 2.5 बॅग) आणि 75 किलो म्युरेट ऑफ पोटॅश (प्रति एकरी अर्धी बॅग) या रासायनिक खतांची मात्रा द्यावी. सूक्ष्म अन्नघटकांची उणीव असणाऱ्या जमिनीत प्रति एकर आठ किलो झिंक सल्फेट आणि चार किलो बोरॅक्‍स वापरावे. लागवडीपासून 30 दिवसांनी कपाशी पात्यावर असताना प्रति एकरी एक बॅग युरिया याप्रमाणे नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. अशाप्रकारे कोरडवाहू बीटी कपाशीस हेक्‍टरी 112 किलो नत्र :56 किलो स्फुरद आणि :45 किलो पालाशची मात्रा द्यावी. तणनियंत्रण कपाशीला लागवडीपासून सुरवातीच्या दोन महिन्यांचा काळ तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. त्याकरिता लागवडीपूर्वी आणि लागवडीनंतर वापरात येणाऱ्या तणनाशकांचा वापर, खुरपणी आणि कुळवाच्या पाळ्या देऊन तण व्यवस्थापन करावे. बीटी कपाशीस लागवडीपूर्वी पेंडीमिथॅलीन या तणनाशकाची 50 मि.लि. मात्रा प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन उगवणीपूर्व फवारणी करावी. फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे आवश्‍यक आहे. त्यानंतर 35-40 दिवसांनी एक खुरपणी द्यावी किंवा तणांचा प्रादुर्भाव असल्यास फिनॉक्‍सी पी. इथाईल 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी किंवा क्विझालोफोप इथाईल (पाच ई.सी.) 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा