रविवार, ३ जून, २०१२

कमी कालावधीचे मूग आणि उडीद

मूग आणि उडीद ही 70 ते 75 दिवसांत येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसावर यांचे उत्पादन घेता येते. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल, त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते. दुबार, तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. मूग आणि उडदाला मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक असते. पाणी साचून राहणारी, क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्‍यक बाब आहे. लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरावी. ती चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरू होताच कुळवाच्या पाळ्या मारून सपाट करावी. धसकटे वेचून घ्यावीत. याच वेळी हेक्‍टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. सुधारित जाती ः मुगामध्ये वैभव व बीपीएमआर - 145 या दोन जाती रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत. या जाती भुरी रोगाला प्रतिकारक आहेत आणि कोपरगाव या पारंपरिक वाणापेक्षा अधिक उत्पादन देतात. कोपरगाव - 1 ही मुगाची जात जुनी असून, त्यावर भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे या जातीची लागवड टाळावी. उडीद पिकाच्या टीपीयू - 4 व टीएयू - 1 या दोन जाती चांगले उत्पादन देतात. टीपीयू - 4 व टीएयू - 1 या दोन्ही टपोऱ्या काळ्या दाण्यांच्या जाती असून, पक्वतेचा कालावधी 70 ते 75 दिवसांचा आहे. पेरणीचे तंत्र ः पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच, म्हणजे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल, त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावे. मूग, उडीद या पिकांच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धक वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुळांवरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते आणि पीएसबीमुळे जमिनीतील स्फुरद मुक्त होऊन पिकास उपलब्ध होते. मूग आणि उडीद ही पिके अतिशय कमी कालावधीची (65 ते 70 दिवस) असल्यामुळे सलग अथवा मिश्रपीक म्हणून घेतली जातात. या पिकांच्या बी पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांमधील अंतर दहा सें.मी. या बेताने पेरणी करावी. पेरणी पाभरीने करणे चांगले. या पिकामध्ये तुरीचे मिश्रपीक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकाच्या दोन ते चार ओळींनंतर एक ओळ तुरीची पेरणी करावी. या दोन्ही पिकांना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच 100 किलो डीएपी प्रति हेक्‍टरी द्यावे. शक्‍यतो रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाण्यालगत पेरून द्यावीत, म्हणजे त्यांचा प्रभाव चांगला होतो. सुरवातीपासूनच पीक तणविरहित ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्‍यक बाब आहे. पीक 20 ते 25 दिवसांचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्‍यतो वाफशावर करावी. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. ही पिके 30 ते 45 दिवस तणविरहित ठेवणे, हे उत्पादनवाढीच्या दृष्टीने आवश्‍यक असते. ही पिके सर्वस्वी पावसावर येणारी आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा परिस्थितीत पाऊस नसेल आणि जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला असेल, तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे

1 टिप्पणी: