शुक्रवार, १५ जून, २०१२

मक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बेडीस यांनी माहिती दिली. मक्‍याचा तुरा काढायचा असेल तर मक्‍यास तुरा आल्यानंतर साधारण सहा ते सात दिवसांनी तुरा काढावयास हरकत नाही. मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या एकेरी संकरित मक्‍याच्या जाती शेतात पेरल्यानंतर मक्‍यास 50 दिवसांनी तुरा (पुंकेसर) येण्यास सुरवात होते. एकाच तुऱ्यामध्ये दीड ते दोन लाख परागकण असतात. हे परागकण सहा ते सात दिवस परागीभवनासाठी क्रियाशील असतात. तुऱ्यातील परागकण स्त्रीकेसरवर पडल्यानंतर फलधारणा होते. फलधारणेनंतर कणसात दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होते. एकूणच सहा दिवसांनी तुऱ्यातील परागकण परागीभवनास पुरेसे होतात. म्हणजेच सहा दिवसांनी तुऱ्यातील परागकण परागीभवनानंतर संपुष्टात येतात. तुरा काढल्यास तुऱ्याकडे वळणारे अन्नद्रव्य कणसातील दाणे भरण्याच्या प्रक्रियेस उपयुक्त ठरतात. यामुळे साधारणपणे दोन-तीन टक्के उत्पादनवाढ होऊ शकते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुरा काढताना अतिशय कुशल शेतमजुरांची गरज असते. डाव्या हातात मक्‍याचे खोड धरावे व उजव्या हाताने तुरा वरच्या सरळ दिशेने खेचावा. तिरकस दिशेने तुरा काढू नये. कारण तसे केल्यास मक्‍याचे झाड कोलमडू शकते किंवा मक्‍याच्या कणसावर हाताचा धक्का लागून कणीस तुटू शकते. तुरा काढणे शास्त्रीयदृष्ट्या फायदेशीर आहे, असे दिल्ली येथील मका संशोधन संचालनालयाने संशोधनातील प्रयोगांती दाखवून दिले आहे. प्रिस्टले (1890) यांच्या रूट प्रेशर थेअरीनुसार अन्नद्रव्य मुळाकडून थेट सर्वोच्च टोकाकडे अगोदर जातात. त्यानंतर झाडाच्या दुसऱ्या भागाकडे उदा. पाने, खोड, फुले, फळे यांच्याकडे अन्नद्रव्य पोचवतात. शास्त्रीय दृष्टिकोनात मक्‍याचा तुरा म्हणजे ऍपिकल डॉमिनन्स, मक्‍याच्या तुऱ्यातील परागकण लागवडीपासून 56-57 व्या दिवशी संपुष्टात येतात. तुरा काढल्यानंतर त्यांचा ऍपिकल डॉमिनन्स संपुष्टात येतो. पर्यायाने अन्नद्रव्य कणसातील दाणे भरण्याच्या प्रक्रियेकडे वळल्याने कणसातील दाणे संपूर्णपणे भरतात. साधारणपणे एका कणसात 550 ते 600 दाणे भरल्यास पिकाचे हेक्‍टरी उत्पादन अधिक होते. ते शेतकऱ्यास फायदेशीर होते. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मका पिकात एका कणसात चारशे ते साडेचारशे दाणे भरतात. तुरा काढल्यास मक्‍याच्या कणसात साडेचारशे दाण्यांवरून सहाशे दाणे भरण्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण होते. राजर्षी हा एकेरी मका संकरित वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील बियाणे विक्री केंद्रावर उपलब्ध असून पाच किलो बॅगेचा दर साडेसहाशे रुपये आहे. ही बॅग एक एकरासाठी पुरेशी होते. तरी शेतकऱ्यांनी सदर बियाणे मिळण्यासाठी विद्यापीठात पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. डॉ. एम. आर. मांजरे, प्रमुख बियाणे अधिकारी, राहुरी (02426) 243355, डॉ. आनंद सोळुंके, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, राहुरी, 02426-243861 संपर्क : डॉ.मधुकर बेडीस, 9850778290 महत्त्वाची गोष्ट तुरा काढण्याचा दुसरा एक फायदा असा, की हा तुरा दुधाळ जनावरांना खाऊ घातल्यास दूध उत्पादनात वाढ होते. पौष्टिक वैरण जनावरांना मिळते. ज्या शेतकऱ्याकडे दुधाळ जनावरे नसतील तर त्यांनी मक्‍याचा तुरा काढला नाही तरी चालेल, कारण मक्‍याचा तुरा काढण्यास मजूर लागतात. मजूर उपलब्ध न होण्याची बिकट समस्या आहे. त्याचा खर्च वाढू शकतो. जर तुरा काढायचा असेल तर साधारणपणे एक एकरातील मका क्षेत्रावर काढणे शक्‍य होते. परंतु ज्या शेतकऱ्यांना पाच ते पंचवीस एकरावर मका लावायचा असेल अशा शेतकऱ्यांनी मक्‍याचा तुरा काढणे म्हणजे मजुरीचा खर्च वाढणे होय. म्हणून मोठ्या शेतकऱ्यांनी मक्‍याचा तुरा काढणे टाळावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा