शुक्रवार, १५ जून, २०१२

अंडे का फंडा

अंड्यामध्ये संतुलित घटकद्रव्ये मोठ्या प्रमाणात असल्याने ते पौष्टिक तसेच पचनास सोपे असतात. प्रथिने व स्निग्ध पदार्थांबरोबरच जीवनसत्त्वे आणि क्षारांचे प्रमाणही अधिक असते. शिवाय अंडे हे स्वस्तात मिळणारे व ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत कुठेही व केव्हाही उपलब्ध होतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात अंड्यांचा वापर करायला हवा. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्य सकाळी उठल्यापासून, रात्री बिछान्यावर पडेपर्यंत सारखा पायाला चाके बांधल्यागत यंत्राप्रमाणे काम करत असतो. रोजची कामाची दगदग, धावपळ, कामाचा वाढता व्याप यामध्ये तो किती ऊर्जा शरीरातून वापरतो व त्याबदल्यात किती ऊर्जा शरीराला पुरवितो आणि आपल्या आहाराकडे किती लक्ष पुरवितो हे न सुटणारे प्रश्‍न आहेत. एकमात्र निश्‍चित की शरीरास पुरविलेली ऊर्जा व शरीरापासून वापरलेली ऊर्जा यातील अंतर व संतुलन बिघडत चालले आहे. शारीरिक व बौद्धिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आहारावर विशेष लक्ष पुरविणे नितांत गरजेचे आहे. दुधानंतर अंडे हे पूर्णान्न म्हणून शास्त्रसिद्ध असले तरी आपल्या भारतीय संस्कृतीत बऱ्याच कारणान्वये अंडे खाणाऱ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. त्यात धार्मिक व सांस्कृतिक परंपरांबरोबरच काही गैरसमजही कारणीभूत आहेत. जसे अंडे हे भारतीय संस्कृतीत मांसाहार या संवर्गात मोडतात व मांसाहार हा त्याज्य असल्याचे मानले जाते. तसेच अंडी हे अति ऊर्जावर्धक असल्याचे समजून ते उन्हाळ्याच्या दिवसांत व जास्त उष्णता असलेल्या व्यक्तीने खाणे चांगले नसते वगैरे. परंतु हे समज, अपसमज निराधारच नसून असयुक्तिकही आहेत. कारण मांसाहार हा प्रकार सजीव हत्या थांबावी या कारणास्तव त्याज्य मानला गेला व अंडे हे कोणत्याही सजीवनिर्मिती अगोदरच खाण्यासाठी वापरले जातात. अंडी खाणे म्हणजे मांसाहार होय असा आरोप करणाऱ्या अंहिसावादी मंडळींना हे सांगितले पाहिजे, की व्यापारी अंड्यांना पुनरुत्पादनाच्या दृष्टीने काहीही किंमत नाही. व्यापारी अंडी हा नरांशी संयोग न होताच तयार झालेली असतात. या अंड्यापासून कुठल्याही परिस्थितीत नवीन जीव तयार होऊ शकत नाही. म्हणूनच जसे दुधामधून गाय तयार होणे शक्‍य नाही, तसेच व्यापारी अंड्यामधून कोंबडी तयार होणे शक्‍य नाही अशा परिस्थितीत जर आपण दूध शाकाहारी आहे असे म्हणतो तर मग अंडी का नाहीत? तेव्हा अंडी ही शाकाहारीच आहेत हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. आज तर उपवासाचे अंडे (अनफर्टिलाइझ्ड) म्हणूनही लोकप्रिय बनत आहेत. दुसरा आरोप कोलेस्टेरॉलसंबंधी आहे. याविषयी प्रथम संपूर्ण माहिती घेणे आवश्‍यक आहे. कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीराचा एक प्रमुख घटक आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचा तो मूलभूत भाग आहे आणि कितीतरी संप्रेरके (हार्मोन्स) जीवनसत्त्व "डी' आणि पित्त आम्ले तयार होण्यासाठी तो आवश्‍यक आहे. हृदयाला कमी रक्तपुरवठा झाल्यास होणाऱ्या रोगाबरोबर रक्तातील कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी ही एक कारण म्हणून सांगितली जाते. पण जर खाण्यात अधिक प्रमाणात कोलेस्टेरॉल असल्यास शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते याबाबत समाधानकारक पुरावा नाही. आपल्या शरीराला साधारणतः 1ः1 ग्रॅम कोलेस्टेरॉल अशी दररोजची गरज असते. शरीरात जितक्‍या प्रमाणात कोलेस्टेरॉलचे शोषण होते, तितक्‍या प्रमाणात शरीरात कोलेस्टेरॉल तयार होण्याचे काम कमी होते. जरुरीपेक्षा अधिक कोलेस्टेरॉल खाण्यात आले असेल तर जास्तीचे कोलेस्टेरॉल न शोषले जाता शरीरातून बाहेर टाकले जाते. या प्रकारच्या तंत्रामुळे आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाते. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य असलेल्या व्यक्तींना खाण्यातल्या कोलेस्टेरॉलची काळजी करीत बसण्याचे कारण नाही. अर्थात, सर्व खाण्याच्या शिफारशी प्रमाणेच समतोल हा राखलाच पाहिजे. तसेच अंड्यामध्ये संतुलित घटकद्रव्ये असून ते पौष्टिक, पचनास सहजसोपे व भेसळरहित असल्यामुळे त्यांचे आहारामध्ये कुणाही व्यक्तीला कोणत्याही ऋतूमध्ये वापर करणे आरोग्यवर्धकच आहे. अंडे हे स्वस्तात मिळणारे व ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत कुठेही व केव्हाही उपलब्ध होतात त्यामुळे प्रत्येकाला आहारामध्ये त्यांचा वापर सहज शक्‍य आहे. अंड्यामध्ये कोणकोणते घटकद्रव्य असतात व त्यांचे किती प्रमाण असते हे तक्‍त्यावरून स्पष्ट होते. अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. विशेष म्हणजे ही प्राणिजन्य प्रथिने असल्यामुळे मानवी पचनास सुलभ, सोपे व शरीराला सहज उपलब्ध होणारे असतात. ही प्रथिने संतुलित व उच्च प्रतीची असतात. मानवी आहारामध्ये वनस्पती प्रथिनांचे प्रमाणच जास्त असते कारण प्राणिजन्य प्रथिनांची मानवी आहारासाठी उपलब्धताच मुळात कमी आहे. परंतु प्राणिजन्य प्रथिने व वनस्पतिजन्य प्रथिने यांचे आहारातील प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे असते. दूध, मांस व मासे हे प्राणिजन्य प्रथिनांची उत्तम उदाहरणे आहेत. परिणामी आहारामध्ये त्यांचा नियमित वापर महत्त्वाचा ठरतो. प्रथिनानंतर स्निग्ध पदार्थाचा क्रमांक लागतो, हे सुद्धा प्राणिजन्य असल्यामुळे पचनास सोपे असतात. या स्निग्ध पदार्थामध्ये ""अनसॅच्युरेटेड'' मेदाम्लाचे प्रमाण ""सॅच्युरेटेड'' मेदाम्लापेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. परिणामी, अंडे हे मानवी आहरामध्ये उत्तम ठरतात. हृदयविकारी लोकांसाठी तर ते अत्युत्तम समजले जातात. अंड्यामध्ये प्रथिने व स्निग्ध पदार्थांबरोबरच जीवनसत्त्वे आणि क्षारांचे प्रमाणही मोठे असते. जीवनसत्त्व "सी' व्यतिरिक्त सर्व जीवनसत्त्वे अंड्यामध्ये असतात. त्याचप्रमाणे क्षारांचे प्रमाणही अंड्यामध्ये अधिक असते. विशेषतः जीवनसत्त्वे "ए' आणि "डी' व "कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोहाचे प्रमाण जास्त असते, जे की मानवी शरीराच्या उत्तम पोषणासाठी अत्यावश्‍यक असतात. इतर पदार्थांमध्ये त्यांचे अंश अत्यल्प असतात. विशेष म्हणजे जीवनसत्त्वे व क्षार शरीरात तयार होत नसल्यामुळे आपणास यासाठी पूर्णतः बाहेरील पुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते. अंड्यामध्ये वरील दोन्हींचे प्रमाण उत्तम असते. अंड्यामधील अन्नद्रव्यांचा (तक्ता क्र. 1) अभ्यास करता अंड्यांचे महत्त्व लक्षात येते. एका अंड्यामध्ये प्रथिने 6.9 ग्रॅम (11.5 टक्के), ऊर्जा 85 कि. कॅलरीज (3.5 टक्के) असतात. तसेच जीवनसत्त्वामध्ये "ए' 188 mcg, "डी' 95 mcg, "के' 0.005 मि.ग्रॅ., "ई' 1.6 मि. ग्रॅ. त्याच प्रमाणे "बी' जीवनसत्त्वेही विपुल प्रमाणात असतात. क्षारांमध्ये "कॅल्शिअम' 35 मि.ग्रॅ. "फॉस्फरस' 125 मि.ग्रॅ. आणि "लोह' 1.3 मि. ग्रॅ. असून इतर क्षारांचे प्रमाणही चांगले असते. अंड्याची इतर पौष्टिक पदार्थांशी (उदा. दूध, कोंबडीचे मांस व सोयाबीन) तुलना करता (तक्ता क्र.2) प्रत्येक 100 ग्रॅम अंडे, दूध, मांस, मासे व सोयाबीन) यामध्ये प्रथिने प्रत्येकी 13.00, 3.30, 26.50, 20.30 आणि 35.50 ग्रॅम तर स्निग्ध पदार्थ प्रत्येकी 11.40, 4.10, 5.00, 4.00 आणि 18.00 ग्रॅम असल्याचे दिसते. अंडे ऊर्जेच्या (160 कि. कॅलरीज) बाबतीत सोयाबीननंतर (432 कि. कॅलरीज) दुसऱ्या स्थानावर असून ते दूध, मांस व मासे यातील ऊर्जेपेक्षा वरच्या स्थानावर असल्याचे स्पष्ट होते. जीवनसत्त्वे आणि क्षारांच्या बाबतीत तर वरील सर्व पदार्थांपेक्षा अंड्यामध्ये त्यांचे प्रमाण अधिक असते. प्रथिनांच्या बाबतीत वरील पदार्थांची तुलना करता अंड्यातील निवळ प्रथिनांची उपलब्धता, प्रथिनांच्या उपलब्धतेचे प्रमाण आणि पचन क्षमतेच्या प्रमाणात अंडे हे इतरांपेक्षा उच्च प्रतीचे असल्याचे (तक्ता क्र. 3) स्पष्ट होते. वैद्यकीय महत्त्व ः वैद्यकीय क्षेत्रात अंड्याचे महत्त्व तर वादातीत आहे. अंड्यामध्ये विविध आरोग्यवर्धक घटकद्रव्य असल्यामुळे त्यांचा वापर विविध औषधींमध्ये विविध कार्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. अंड्याचा अँटिऑक्‍सिडंट्‌स, अँटिकासिनोजनिक, अँटिनायक्रोविवल्स, अम्युनोस्टिकट्‌स म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अंड्यामधील तेल व पिवळा बलक हे विविध आजारांवर जसे डोळ्यांचे विकार, कातडीचे विकार, तसेच हाडांचे विविध विकार जसे सांधे -----दुखी, गुडघा ----दुखी, पाठीच्या कण्याचे विकार तसेच इतरही छोट्यामोठ्या आजारांवर, व्याधींवर रामबाण औषधासारखा उपयोग होतो. औषधाप्रमाणेच. सौंदर्य प्रसाधने आणि विविध खाद्य पदार्थांमध्येही विशेष घटकद्रव्ये म्हणून अंड्यातील पिवळा बलक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. परिणामी, अंड्याचे आहारातील महत्त्व वादातीत बनते. आर्थिक महत्त्व ः आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता एक अंडे हे एक कप चहा, कॉफी, अल्कोहोल किंवा इतर पेय व पदार्थ यापेक्षा तुलनेत आजही स्वस्त आहे. तसेच ते या सर्व पदार्थांपेक्षा जास्त पौष्टिक, ऊर्जा व प्रथिनेयुक्त आहे. तेव्हा त्यांचा आहारामध्ये नियमित वापर करण्यास कुठलाही प्रत्यवाय नसल्याचे दिसते. आज महाराष्ट्रासह देशासमोर कुपोषणाचा व अल्पपोषणाचा मोठा प्रश्‍न आहे. शासनातर्फे विविध योजनांद्वारे विविध खाद्य पदार्थ अशा आदिवासीसाठी व कुपोषित भागात पाठविले जातात. त्यामध्ये अनंत अडचणी येत असल्याचे स्पष्ट होते. तेव्हा अशा भागात अंड्याची स्वस्तात व मुबलक प्रमाणात उपलब्धता करून व शासनाच्या विविध योजनांमध्येही अंड्याच्या पुरवठ्यास मोठ्या प्रमाणात उत्तेजन देणे सहज शक्‍य आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा