रविवार, ३ जून, २०१२

तंत्र गोड ज्वारी लागवडीचे...

गोड ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. याच्या ताटाच्या रसापासून काकवी, गूळ आणि इथेनॉल बनविता येते. या ज्वारीची लागवड कडब्याच्या ज्वारीसारखी केल्यास दुभत्या जनावरांना चविष्ट व पौष्टिक कडबा मिळून अधिक दूध उत्पादनासाठी फायदा होईल. गोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असल्यामुळे गोड ज्वारीची लागवड करताना सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्‍यक आहे. गोड ज्वारीची कायिक वाढ नेहमीच्या ज्वारीपेक्षा जास्त असते, तसेच तिच्या ताटाच्या रसामध्ये अधिक साखरेचे प्रमाण (ब्रिक्‍स) जास्त आहे. या ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. याच्या ताटाच्या रसापासून काकवी, गूळ आणि इथेनॉल बनविता येते. त्याचप्रमाणे या ज्वारीची लागवड कडब्याच्या ज्वारीसारखी केल्यास दुभत्या जनावरांना चविष्ट व पौष्टिक कडबा मिळून अधिक दूध उत्पादनासाठी फायदा होईल. उसाच्या तुलनेने इथेनॉल निर्मितीसाठी गोड ज्वारीचे बरेच फायदे आहेत. गोड ज्वारीच्या ताटापासून रस काढल्यानंतर राहिलेला चोथा गुरांना चारा म्हणून वापरता येतो. आपण "खरीप ज्वारी व्यापारासाठी आणि रब्बी ज्वारी खाण्यासाठी' हे तत्त्व समोर ठेवले तर खरीप ज्वारी लागवडीचे क्षेत्र वाढेल. लागवडीचे तंत्र ः गोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असल्यामुळे गोड ज्वारीची लागवड करताना खालील बाबींचा तंतोतंत अवलंब करावा. जमीन मध्यम ते भारी असणे आवश्‍यक आहे. हलक्‍या जमिनीवर गोड ज्वारीची लागवड करू नये. जमिनीच्या मशागतीच्या वेळेस दोन नांगरणी बरोबर एक किंवा दोन वखराच्या पाळ्या मारून जमीन समपातळीत आणावी. ही ज्वारी खरीप आणि उन्हाळी हंगामात चांगल्या प्रकारे येऊ शकते. खरीप हंगामात ज्वारीची पेरणी योग्य पाऊस झाल्याबरोबर 15 दिवसांच्या आत करावी आणि उन्हाळी हंगामात गोड ज्वारीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करणे आवश्‍यक आहे. एकरी 2.5 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. खोडमाशीच्या नियंत्रणासाठी बियाण्यास 2.5 ग्रॅम थायमेथोक्‍साम (70 टक्के) प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणीपूर्वी जमिनीत 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश व शेवटच्या नांगरणीवेळेस 10 टन प्रति हेक्‍टरी शेणखत द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी पीक कांडे धरण्याच्या कालावधीत (गर्भधारणा अवस्था) पेरणीनंतर एक महिन्याने कोळप्याच्या मागे मोग्याने द्यावे. ज्वारीची वाढ चांगली होण्यासाठी दोन ओळींतील अंतर 60 सें.मी. व दोन झाडांमधील अंतर 12 ते 15 सें.मी. ठेवावे. त्यामुळे झाडाची संख्या एक लाख दहा हजार प्रति हेक्‍टरी राहील. जोमदार एक रोप ठेवून बाकीची झाडे जमिनीलगत वाकवून काढून टाकावीत. योग्य पाण्याचा पुरवठा मूलस्थानी पाण्याचे व्यवस्थापनेसाठी एक ते दोन कोळपण्या, कोळप्याच्या खाली दोरी बांधून केल्यास तणाचा बंदोबस्ताबरोबरच जमिनीतील पाणी टिकवून राहण्यास मदत होईल. योग्य पीक व्यवस्थापन ठेवल्यास गोड ज्वारीपासून एकरी 12 ते 15 टन हिरवा चारा मिळू शकतो. याच्या रसापासून आपणास हेक्‍टरी 2000 ते 2500 लिटर इथेनॉल तयार करता येते. लागवडीसाठी वाण ः एसएसव्ही-84, फुले अमृता (आरएसएसव्ही-9) शुगरग्रे, ऊर्जा, सीएसएच-22, आयसीएसव्ही-93046, आयसीएसव्ही- 25274 गोड ज्वारीचे फायदे ः - हे पीक चार महिन्यांत येते, त्यामुळे दरवर्षी दोन पिके घेता येतात. - हे जिराईत पीक आहे. हे पीक सर्वांत अधिक जमिनीतील पाण्याचा उपयोग घेणारे पीक म्हणून ओळखले जाते. - याच्या लागवडीचा खर्च कमी आहे. - यामध्ये कमी होणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यातील रस इथेनॉलसाठी योग्य आहे. - याच्या चोथ्याचा जनावरांच्या खाद्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग होतो. - काही प्रमाणात धान्याचे उत्पादन मिळते. - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक. या ज्वारीपासून मिळणाऱ्या इथेनॉलमुळे वातावरणातील होणारे प्रदूषण कमी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा