रविवार, ३ जून, २०१२

तूर पेरणीची वेळ साधा

तुरीची पेरणी शिफारशीत कालावधीत होणे आवश्‍यक आहे. पहिल्या पावसानंतर शेत काडीकचरा वेचून स्वच्छ करावे आणि पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी दहा जुलैपूर्वी पेरणी पूर्ण करणे गरजेचे आहे. तुरीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. कसदार, भुसभुशीत, पोयट्याच्या जमिनीतसुद्धा तूर चांगली येते. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. लागवड करणाऱ्या जमिनीत स्फुरद, कॅल्शिअम, मॅंगेनिज, गंधक या द्रव्यांची कमतरता नसावी. साधारणतः साडेसहा ते साडेसात सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली खोल नांगरट करावी. तुरीची पेरणी वेळेवर होणे आवश्‍यक आहे. पहिल्या पावसानंतर शेत चांगले तयार करावे. काडीकचरा वेचून स्वच्छ करावे आणि पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी दहा जुलैपूर्वी पेरणी करावी. आंतरपीक पद्धती ः तूर हे बहुतांशी आंतरपीक म्हणून घेतले जाते. तूर + बाजरी (1ः2), तूर + सूर्यफूल (1ः2), तूर + सोयाबीन (1ः3 किंवा 1ः4), तूर + ज्वारी (1ः2 किंवा 1ः4), तूर + कापूस (1ः किंवा 1ः8), तूर + भुईमूग, तूर + मूग, तूर + उडीद (1ः2) अशा प्रकारे पेरणी केल्यास दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले येते. आंतरपिकासाठी निवडावयाच्या तुरीच्या जाती या मध्यम मुदतीच्या असाव्यात. अलीकडच्या काळात तीन ते चार ओळी सोयाबीन आणि एक ओळ तूर अशा पद्धतीने दोन्ही पिकांचे चांगले उत्पादन येत असल्याचे दिसून आले आहे. तुरीचे सलग पीकसुद्धा चांगले उत्पादन देते. सलग पीक घ्यावयाचे असल्यास आयसीपीएल-87 या वाणाकरिता 45 x 10 सें.मी. अंतर ठेवावे, एकेटी-8811 करिता 45 x 20 सें.मी. अंतर ठेवावे. अधिक कालावधीच्या वाणाकरिता 60 x 20 सें.मी. अंतर ठेवावे. आयसीपीएल-87 च्या पेरणीसाठी हेक्‍टरी 20 ते 25 किलो बियाणे लागते. मध्यम मुदतीच्या विपुला व एकेटी-8811 या वाणासाठी हेक्‍टरी 12 ते 15 किलो बियाणे पुरते. उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लावावयाच्या वाणासाठी हेक्‍टरी दहा ते 12 किलो बियाणे पुरते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम थायरम + दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 25 ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे. खत व्यवस्थापन ः सलग तुरीसाठी माती परीक्षण अहवालानुसार हेक्‍टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. मिश्र पीक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलेली खतमात्रा द्यावी. उदा. सोयाबीनकरिता 50 किलो नत्र आणि 75 किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी. आंतरमशागत ः पिकात 15 ते 20 दिवसांनंतर कोळपणी करावी. पुढे 15 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर 30-45 दिवस शेत तणविरहित ठेवावे. ------ जाती ः तुरीमध्ये आयसीपीएल-87 (120 दिवस), एकेटी-8811 (140 दिवस), बीएसएमआर-853 (160 दिवस), बीएसएमआर-736 (180 दिवस) अशा चांगल्या जाती आहेत. आपल्या शेतीला अनुकूल अशा योग्य कालावधीच्या जाती निवडाव्यात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विपुला ही 145 ते 160 दिवसांत तयार होणारी रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणारी जात प्रसारित केली आहे. --------- पाणीव्यवस्थापन ः तूर हे प्रामुख्याने खरीप हंगामातील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढते. तथापि, पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये (30 ते 35 दिवस), फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये (60 ते 70 दिवस) आणि शेंगा भरावयाच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. चांगल्या व्यवस्थापनात सरासरी 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळू शकते. ----------- संपर्क ः 02426-233447 कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा