सोमवार, २५ जून, २०१२

तंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...

Monday, June 25, 2012 AT 03:30 AM (IST) Tags: agro plannig खरीप कांद्याचे एकरी कमीत कमी आठ ते दहा टन उत्पादन मिळणे आवश्‍यक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तर कांदा सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात काढणीला येतो. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने खरीप कांदा उत्पादनाच्या अडचणी समजून उत्पादन तंत्र विकसित केले आहे. डॉ. विजय महाजन खरीप हंगामात होणारा रोगांचा प्रादुर्भाव, सतत पडणाऱ्या पावसामुळे फवारणी करण्यास अडचण, पाण्याचा निचरा न झाल्याने कांदे सडतात, माना लांब होतात, त्यामुळे कांदे न पोसणे, ओल्या जमिनीमुळे सुकवणी न होणे, कापणीनंतर लगेच कोंब येणे या समस्यांमुळे खरीप कांदा लागवड परवडत नाही. बी फोकून किंवा पेरून लागवड केल्यामुळे त्यात व्यवस्थित अंतर राखता येत नाही. दाटी झाली तर विरळणी करावी लागते. तणाचा जोर वाढला तर कांद्याची रोपे पिवळी पडतात, खुरटी राहतात, प्रसंगी मरतात. शिवाय, खुरपणीचा खर्च वाढतो. खरीप कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळवायचे असेल तर लागवडीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्‍यक आहे. खरीप कांदा ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांत बाजारात आणता आला तरच चांगला भाव मिळतो, त्यासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्यात बी पेरणी करून, रोपांची लागवड जून-जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणे आवश्‍यक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तर कांदा सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात काढणीला येतो. या काळात पाऊस नसेल तर काढणी व तात्पुरती सुकवणी चांगली होऊ शकते. रोपांची लागवड जितकी उशिरा होईल तितकी काढणी लांबते. डिसेंबर - जानेवारीत कांदा काढणीस आला तर त्यास राजस्थान व कर्नाटकमधून येणाऱ्या कांद्याशी स्पर्धा करावी लागते. पर्यायाने भाव कमी मिळतात. जातींची निवड खरीप हंगामासाठी अधिक आर्द्रता, दमटपणा अशा प्रकारच्या वातावरणात तग धरणारी आणि 90 ते 100 दिवसांत तयार होणारी जात आवश्‍यक असते. बरेच शेतकरी पारंपरिकरीत्या वाढवलेल्या हळवा प्रकारातील जातीची लागवड करतात. त्यामुळे रंग, आकार व वजन याबाबत एकसारखेपणा नसतो; तसेच सर्वच कांदे एकसारखे पोसत नाहीत. चिंगळी कांद्याचे प्रमाण जास्त असते. हे लक्षात घेऊन लागवडीसाठी बसवंत 780, फुले समर्थ, ऍग्रिफाउंड डार्क रेड, अर्का कल्याण, एन 53, भीमा सुपर जातींची निवड करावी. लागवडीचा आराखडा पारंपरिक पद्धतीने शेतकरी सरी - वरंबे किंवा सपाट वाफ्यांत रोपांची लागवड करतात. कधी-कधी जोराचा पाऊस झाला तर वाफ्यांत पाणी साचते. तेव्हा लागवडीसाठी हलक्‍या मुरुमाच्या व उताराच्या जमिनी निवडाव्यात. लागवडीच्यादृष्टीने उताराशी समांतर रुंद गादीवाफे करावेत. गादीवाफे ट्रॅक्‍टरच्या सरी यंत्राने करता येतात. गादीवाफ्याची रुंदी 120 सें.मी. असावी. दोन बाजूच्या सऱ्या एक फूट रुंदीच्या असाव्यात. पाणी देण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचे नियोजन करावे. गादीवाफ्यावर रोपांची लागवड करावी. या लागवडीत पावसाचे पाणी साचत नाही, त्यामुळे कांदे सडणे किंवा माना लांबणे हे प्रकार होत नाहीत. गादीवाफ्याची उंची 15 सें.मी. असल्याने मुळांजवळ पाणी साचत नाही. पावसाचे पाणी वाफ्यावरून बाजूच्या सरीमध्ये जमा होते. वाफे जमिनीच्या उताराशी समांतर असल्याने सहज वाहून नेता येते. सरी - वरंब्यात पाणी बराच काळ साचून राहिले व व्यवस्थित वाफ्याच्या बाहेर काढता आले नाही तर सड वाढते; शिवाय सरी - वरंब्यात रोपांची संख्या लागवडीत कमी बसते. खरीप हंगामात 10 x 15 सें.मी. अंतरावर पुनर्लागण करावी. रोपे लागवड करताना ती अंगठ्याने दाबू नयेत, यामुळे माना वाकड्या होऊन वाढीस वेळ लागतो. कांदा संशोधन केंद्रावर खरीप हंगामात 1100 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडून देखील रुंद गादी वाफ्यावर खरीप जातीचे हेक्‍टरी 25 टनपेक्षा जास्त उत्पादन मिळाले. खतांचे नियोजन कांदा पिकाला माती परीक्षणानुसार प्रति हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश व 45 किलो सल्फर (गंधक)ची शिफारस केली आहे. दहा टन शेणखत व पाच टन कोंबडी खत नांगरणीनंतर उन्हाळ्यात पाळीपूर्वी द्यावे. शेणखत टाकण्यापूर्वी जवळ-जवळ 15 ते 20 दिवस आधी त्यात पाच किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळून खताच्या ढिगाला हलके ओले करून झाकून ठेवावे. त्यामुळे शेणखतात ट्रायकोडर्माची चांगली वाढ होते. त्यानंतर हे शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. तुषार सिंचनाची सोय असल्यास सात सें.मी. खोलीपर्यंत पाणी द्यावे, त्यामुळे गवताचे बी उगवून येते, तणांचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते. वाफसा आल्यानंतर काकऱ्याची पाळी करावी, त्यामुळे उगवलेल्या तणाचे नियंत्रण होते. रुंद गादी वाफे तयार करण्यापूर्वी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश दाणेदार खताच्या माध्यमातून पेरावे. त्यासोबत दाणेदार गंधक 45 किलो वापरावे. खत पेरून गादी वाफे तयार करावेत. खत अगोदर पेरल्यामुळे ते योग्य खोलीवर गाडले जाते. राहिलेले 50 किलो नत्र तीन-चार हप्त्यांत द्यावे. ठिबक सिंचन असेल तर खताच्या टाकीतून युरियाद्वारे नत्र द्यावे. तुषार सिंचनाचे नियोजन असेल तर गादी वाफ्यावर हाताने फेकून द्यावे व नंतर संच चालवावा. सतत पडणाऱ्या पावसाने व वाहत्या पाण्याने खत मुळाच्या खाली जाते किंवा वाहून जाते, तेव्हा एकाच वेळी जास्त खत न देता चार ते पाच हप्त्यांत विभागून द्यावे. पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर एकदा व 75 दिवसांनंतर दुसऱ्यांदा 19ः19ः19 या विद्राव्य खताची (पाच ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी. सोबत स्टिकर्स मिसळावे. गरजेनुसार 0ः0ः50 या खताचाही वापर (पाच ग्रॅम प्रति लिटर) करावा. फवारणीद्वारे ही खते दिल्यामुळे कांद्याची फुगवण चांगली होते. आवश्‍यकतेनुसार माती परीक्षणानुसार जस्त, लोह व मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. पिकाची फाजील वाढ थांबविणे कसदार जमीन, खतांच्या अधिक मात्रेमुळे कांद्याची पात वाढते. माना जाड होतात. कांदा पोसण्यास सुरवात 80 ते 90 दिवसांनंतर होते, त्यामुळे काढणी लांबते, कांदे लांबुळके निघतात. उशिरा लागवड झाली असेल, तरीदेखील पानांची वाढ मर्यादेपेक्षा जास्त होते. पानांची वाढ रोखण्यासाठी व कांदे पोसण्यासाठी पीक 60 ते 75 दिवसांचे असताना त्यावर एक लिटर पाण्यात सहा मि.लि. क्‍लोरमेक्वॉट क्‍लोराईड हे वाढप्रतिबंधक संजीवक फवारावे. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. पाणी व्यवस्थापन पावसाच्या दोन पाळ्यांत अंतर पडले तरच ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे एक-दोन वेळा पाणी द्यावे. काढणीपूर्वी दोन आठवडे अगोदर पाणी बंद करावे, त्यामुळे कांदा चांगला पोसतो, सड कमी होते, माना जाड होत नाहीत. सध्याच्या परिस्थितीत जमिनीचा पोत आणि पावसाची परिस्थिती पाहून पाणी व्यवस्थापन करावे. तणांचे नियंत्रण कांद्यामध्ये तणांचा बंदोबस्त वेळेवर केला नाही, तर 40 ते 50 टक्के नुकसान होते. खरीप हंगामात इतर हंगामांपेक्षा तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोपांची लागवड करण्याअगोदर तीन दिवस आधी वाफ्यावर ऑक्‍सिफ्लोरफेन 1.5 मि.लि. प्रति लिटर किंवा पेंडीमिथॅलीन एक लिटर पाण्यात तीन मि.लि. या प्रमाणात फवारले, तर 45 दिवसांपर्यंत तणांचा उपद्रव होत नाही. तणनाशक मारताना जमिनीत भरपूर ओलावा असणे आवश्‍यक आहे. 45 दिवसांनंतर केवळ गवत उपटून काढले तर तणांचे संपूर्ण नियंत्रण होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा