रविवार, १७ जून, २०१२

यशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात!

गेल्या 40 वर्षांत आपण कोट्यवधी दुधाळ जनावरे राज्याबाहेरून आणून स्वयंरोजगारास प्रोत्साहन दिले. पण दुधाळ जनावरे खरेदी करायची अन्‌ दूध आटताच ती विकून टाकायची अशी प्रथा जन्माला आली आहे. यातून पैसा, पशुधन आणि विकास संपूर्ण बुडाला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा दुधाळ जनावरे वाटण्याऐवजी, भाकड काळ कमी ठेवून यशस्वी दूध व्यवसायाच्या वैज्ञानिक तंत्राचा प्रसार करणे, या तंत्राचे वाटप व्यापकपणे झाले पाहिजे. समाजसेवी कार्यासाठी समाजमन विकसित होणे गरजेचे असते. सामाजिक प्रश्‍नांची जाणीव असताना केलेले कार्य मोलाचे ठरते. गोरगरीब, मजूर, शेतकरी, स्वयंरोजगार यांना पशुधन वाटप करून समाजकार्याचा वसा सिद्ध करणाऱ्या संस्था राज्यात आहेत ही अभिमानाची बाब. काही दूध व्यावसायिकांचा अपवाद सोडल्यास, बहुतेक पशुपालकांना दूध व्यवसाय तोट्याचाच किंवा फार तर बरोबरीचा सुटल्याचा अनुभव येतो. महागाई, प्रतिकूल परिस्थिती, बाजारभाव, मनुष्यबळ असे अनेक प्रश्‍न भेडसावत असताना जनावरांकडून फारसा फायदा होत नसल्याचा सूर ऐकू येतो. खरोखर दूध व्यवसाय फायद्याचा आहे का, याचे उत्तर राज्यात स्पष्टपणे कधीच मांडले गेले नाही. दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी भाकड जनावरे घेऊन, बदल्यात दुधाळ जनावरे देण्याची संकल्पना एका सेवाभावी संस्थेने समोर आणली. अशा योजनांना मनापासून दाद देणे, कार्यात्मक सहभाग नोंदवणे, पाठबळ देणे, उचित कल्पनेचा गौरव करणे सर्वांचे कर्तव्य ठरते. मात्र अशा सामाजिक दातृत्वास वगळून ज्यांच्यासाठी अशी योजना राबवायची, त्यांच्याबाबत काही बाबी महत्त्वाच्या ठरतात. मुळात भाकड गाय खर्चामुळे सांभाळायला परवडत नाही, याचा विचार करावा लागेल. भाकड काळ फार तर 60 दिवसांचा अपेक्षित असतो. त्यात पहिले तीस दिवस साधारण पोषणाचे आणि केवळ दैनंदिन गरज भागवताना गर्भासाठी थोड्या अधिक पोषणाचे असतात. शेवटच्या तीस दिवसांत प्रसूतिपूर्वी आहार जोमाने वाढवावा लागतो. जगात सगळ्या प्रक्षेत्रावर भाकड काळ 60 दिवस असणाऱ्या गाई फायद्यात असताना प्रत्येक गोठ्यात हा खर्च सारखाच गृहीत धरला तरच दूध व्यवसायाचे गणित मांडता येते. भाकड काळातील पोषणाचा खर्च प्रसूतीनंतर मिळणाऱ्या वेतात भरून निघतोच आणि त्या वेताच्या उत्पन्नाचाही भाग ठरतो. राज्यात जनावरांचा भाकड काळ मोठा असणे, प्रसूतिपूर्वी पोषण कमी असणे, सुलभ प्रसूतीची खात्री नसणे आणि दूधकाळात उत्पादनात मोठे अडथळे निर्माण होणे ही मालिका संपतच नाही. म्हणून जनावरे परवडत नाहीत. दुभत्या जनावराकडून वर्तमानात होणारा आहार खर्च आणि सगळे खर्च वसूल होणे, भविष्यातील भाकड काळातील खर्चाची तरतूद आणि वेताच्या संपूर्ण कालावधीत व्यावसायिकास क्षमतेप्रमाणे खिशात पडणारा नफा अपेक्षित असतो. जी दुभती गाय तिच्या खाण्यापिण्याच्या खर्चालाच महाग ठरते तिला व्यावसायिकाची गाय म्हणता येत नाही. तेव्हा वेतात असतानाच तोट्यात जाणाऱ्या गाई भाकड काळात खर्चाचे ओझे वाढवितात. दुभत्या गाईकडून तोटा होता म्हणजे पशुपालन शास्त्र चुकतेय, हे समजावे. दुभती गाय फायद्यातच असते आणि नेहमी ही बाब अनुभवतो तोच दूध व्यावसायिक. दुभत्या गाईकडून जास्त दूध कसे मिळवायचे, दुधाची घट कशी थांबवायची, दूधप्रत कशी वाढवावी, दूध कमी करणारे आजार नियंत्रणात कसे ठेवायचे याबाबत माहिती असावी. भाकड काळ नसणारी आणि केवळ दूधच दूध देणारी जादुई गाय जगात कुठेच नाही. भाकड काळ हा अपरिहार्य आहे. तो कमीत कमी ठेवण्याचे तंत्र ज्या पशुपालकाला जमते तोच दुधात फायदा मिळवू शकतो. भाकड काळाचा विचार दूध संपताना नव्हे तर जनावरे दुधात असतानाच करावा लागतो. म्हणून प्रसूतीनंतर तीन महिन्यांत गाय, तर चार महिन्यांत म्हैस पुन्हा गर्भधारणेत यावी लागते. दुधाच्या जनावरांना भाकड करणे फार अवघड नाही. मात्र भाकड जनावरे दुधात आणणे मोठे कठीण असते. आपले जनावर अल्प भाकड आणि दीर्घ दुधाळ काळात असावीत अशी योजना उद्योजक दूध उत्पादकांना करावी लागते. फायदेशीर आणि शाश्‍वत दूध व्यवसायाचे तंत्र इथेच दडले आहे. पुन्हा पुन्हा जनावरे बदलणारे, दूध संपताच जनावरे विकणारे, गोठ्यात जनावरे गाभण प्रमाणात वाढ न करू शकणारे पशुपालक नेहमी अडचणीत असतात. कोणतेच अनुभव फायद्यात दिसून येत नसल्याने फक्त व्यावसायिक हातबदल करताना जनावरे तोट्यात जातात. राज्यात काही लोक भाकड जनावरे खरेदी करून त्यांना दुधाळ स्थितीत बदल करतात आणि मोठ्या आर्थिक फायद्यात राहतात असेही दिसून येते. यातला आर्थिक मलिदा तंत्र व कौशल्यात दडला असल्याने प्रत्येक पशुपालकाला भाकड जनावरे दुधाळ करण्याचे तंत्र अवगत असावे. मात्र ते हक्काने मिळवणारा पशुपालक दिवसेंदिवस कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे. मानवी चुकांतून भाकड झालेली जनावरे किती वगळायची आणि मग दुधासाठी कोणत्या जनावरांकडे पाहायचे हा यक्षप्रश्‍न ठरतो. राज्यात भाकड कालावधी कमी होण्यासाठी मोठी जागृती पशुपालकात निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी कार्यात्मक सहभागाचे प्रयोग यशस्वी ठरू शकतील. भाकड काळाने ग्रस्त असणारी देशी जनावरे पशुपालकांनी दुधाळ केल्यास राज्यातील गोवंशसंवर्धन चळवळ दृढ होऊ शकेल. संकरित जनावरे कधीच प्रलंबित भाकड काळात जाणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक व्यवस्थापन पशुपालक - उत्पादकांकडून अपेक्षित आहे. म्हशींचा भाकड काळ नियंत्रित राहिल्यास फायद्याचे स्रोत आपोआप वाढणार यात शंका नाही. योजनेतून दुधाळ जनावरे मिळविण्याची लालसा धरण्यापेक्षा, आपल्या गोठ्यातील जनावरांचा भाकड काळ कमी करण्याचे प्रयत्न राबविल्यास राज्यात शास्त्रोक्त दूध व्यवस्थापनात फायदेशीर पशुपालन व्यवसाय सुरू होईल. आव्हान स्वीकारणारा पशुपालक भाकड काळावर यशस्वी मात करणारा ठरल्यास पशुधन वाटप मोठ्या प्रमाणात सुरू होईल. शाश्‍वत दूध व्यवसायाला आज खरी गरज आहे जनावरांतील गर्भधारणेचे प्रमाण वाढवून दुधाळ जनावरे निर्माण करणाऱ्या पशू अभियंत्यांची. मात्र त्यासाठी कुणी दुधाळ जनावर देईल का, अशी अपेक्षा त्याग करण्याची गरज आहे. संपर्क - 9422657251 पैसे कमवा.. http://signup.wazzub.info/?lrRef=0a9bdeff या लिंकवर क्लिक करून जॉईन करा आणि पैसे कमवा आपल्याला फक्त जोन करायचे आहे . आपल्याला काहीही पैसे लागणार नाहीत फक्त जॉईन करा आणि साईट तिच्या नाफ्यामाध्ले ५० % आपल्यायुझसरस मध वाटणार आहे plz जॉईन करा http://signup.wazzub.info/?lrRef=0a9bdeff Call 9096566511

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा