रविवार, ३ जून, २०१२

कसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन?

आज विदर्भात 97 टक्के क्षेत्रावर बीटी कपाशी पेरली जाते. परंतु उत्पादकतेत वाढ होताना दिसत नाही. म्हणजेच कमी किंवा जास्त ओलाव्यामुळे अपेक्षित उत्पादन होत नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, संरक्षित ओलित व्यवस्थापन असणे अत्यंत गरजेचे आहे. वाणाची योग्य निवड, खते, पाणी व एकात्मिक कीड व्यवस्थापन आदींच्या नियोजनातून संकरित बीटी कपाशीचे उत्पादन वाढवणे शक्‍य होईल. ........................................... बीटी संकरित वाणाची वैशिष्ट्ये ः * बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नसल्याने पात्या, फुले व बोंडे लवकर व भरपूर प्रमाणात लागतात. त्यामुळे पहिल्या दोन वेचणीत जास्तीत जास्त कापूस मिळतो. * कवडी कापूस कमी झाल्याने उत्पादन व कापसाचा दर्जा चांगला मिळतो. * बोंडअळीसाठीच्या फवारणीचा खर्च कमी झाला आहे. * 25-30 टक्के कापूस उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. बीटी संकरित वाणाच्या अडचणी ः * बीटी कपाशीवर बोंड अळी येत असली तरी रसशोषक किडींचा उदा. पिठ्या ढेकूण, मिरीड बग व पांढरी माशी तसेच क्‍लिष्ट स्वरूपाची "लाल्या' ही विकृती समस्या होऊन बसली आहे. * कोरडवाहूमध्ये अधिक उत्पादनाकरिता एकरी 8000 ते 9000 झाडांची संख्या ठेवण्यासाठी 800 ते 900 ग्रॅम बियाणे वापरणे शेतकऱ्यांना महागडे होऊन बसले. कमी बियाणे शेतकरी जास्त अंतर (3 x 3, 4 x 4 फूट) ठेवून पेरतात. * बीटी कपाशीचे सर्वच वाण संकरित वाण असल्याने दरवर्षी नवीन बियाणे घ्यावे लागते. * संकरित वाणाकरिता मध्यम ते भारी जमीन लागते; परंतु हलक्‍या जमिनीवरसुद्धा कपाशी घेतली जात आहे. * बहुतांश बीटी वाण एका ठराविक कालावधीत फलधारणा पक्व करण्याची क्षमता राखत असल्याने अन्नद्रव्यांची आणि पाण्याची कमतरता पडल्याने उत्पादनात घट येते. * वेळेवर पेरणी, आंतरमशागत, निंदणी आणि वेचणीच्या वेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. - कोरडवाहूत "लाल्या' विकृतीवर हमखास उपाय मिळालेला नाही. * एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. संकरित बीटी कपाशीच्या अधिक उत्पादनासाठी महत्त्वाची सूत्रे ः जमिनीची निवड ः बीटी कपाशीकरिता मध्यम ते खोल काळी जमीन (50 ते 90 से.मी. खाली) तसेच पाण्याचा निचरा होणारी जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 असणाऱ्या जमिनीत लागवड करावी. हलक्‍या जमिनीत (25 सें.मी. खोली) लागवड करू नये. वाणाची निवड ः बाजारात बीटी संकरित वाण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्या गावात/शेतात जे वाण चांगले उत्पादन देतात तसेच रस शोषक किडी आणि रोगांना कमी बळी पडणाऱ्या वाणाची निवड करावी. पेरणी व अंतर ः पूर्वमॉन्सून कपाशीची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठिबक सिंचन पद्धतीने पेरावयाचे झाल्यास जमीन भुसभुशीत केल्यावर नळ्या अंथरून 5 x 1, 5 x 1.5, 4 x 1.5, 4 x 1, 4 x 2 फूट अंतरावर लागवड करण्याच्या दृष्टीने दोन लिटर पाणी सोडावे त्यानंतर कुजलेले शेणखत मूठभर टाकून तेथे बियाणे टोकावे. चौफुलीवर एकच बियाणे लावायचे असेल तर त्याची दिवशी 10-25 टक्के बियाण्याची लागवड प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये करून तुटक खाडे भरण्यासाठी उपयोगाच आणावे. जोड ओळ पद्धतीने 60-120 x 60 सें.मी.मध्ये लागवड करता येते. रुंद वरंबा सरी पद्धत किंवा ठराविक अंतरावर सरी वरब्यांवर लागवड करावी. कोरडवाहूमध्ये मॉन्सूनचा पाऊस 75 ते 100 (3 ते 4 इंच) मि.मी. झाल्यावर लागवड करावी. दोन तासांतील आणि झाडांतील अंतर विदर्भासाठी 90 x 45 सें.मी. आणि मराठवाड्यात 120 x 45 सें.मी. तर ओलितासाठी 150 x 30 सें.मी.ची शिफारस केलेली आहे. आपण निवड केलेल्या वाणाचा गुणधर्म, कायिक वाढीचा आणि जमिनीच्या मगदुराचा विचार करूनच अंतर ठरवावे. प्लॅस्टिकच्या ग्लास/पिशवीत रोपे लावून खाडे भरावे किंवा त्वरित खाडे भरावे. उगवणीनंतर एक आठवड्याचे आत खाडे भरावे. पिशवीमध्ये मिळणारे नॉन बीटीचे बियाणे शेताच्या चारही बाजूला कमीत कमी 2 ते 3 ओळी पेराव्यात. परंतु कोणीही शेतकरी हे करताना आढळत नाहीत. याचा परिणाम भविष्यात बीटीवर बोंडअळ्या येण्याचा संभव उद्‌भवेल. खत व्यवस्थापन ः जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी तीन वर्षातून एकदा जमिनीची मशागत करताना शेवटच्या वखरणीच्या वेळी हेक्‍टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा 3 टन गांडूळ खत शेतात टाकून सारखे पसरवून घ्यावे. रासायनिक खताची मात्रा माती परीक्षण अहवालानुसार द्यावी. ज्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे गरजेचे आहे. बीटी कपाशीकरिता रासायनिक खताची मात्रा विदर्भासाठी कोरडवाहूमध्ये 60ः30ः30 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/हेक्‍टर ओलिताकरिता- 100ः50ः50 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/ हेक्‍टर मराठवाडा- 120ः60ः60कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/हेक्‍टर ओलीताखाली- 150ः75ः75 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश/हेक्‍टर .......................... संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धे नत्र पेरणीवेळी तर उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावे. ओलिताखालील कपाशीमध्ये नत्र तीन वेळा विभागून द्यावे. स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा कारण यामध्ये 12 टक्के गंधक असल्याने सरकीत तेलाचे प्रमाण वाढविण्यास मदत करते. ............................. 60ः30ः30 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाशसाठी खते किती द्याल? * हेक्‍टरी 60 किलो नत्रासाठी 130 किलो युरिया किंवा एकरी 50 किलो युरिया. * हेक्‍टरी 30 किलो स्फुरदासाठी 185 किलो सुपर फॉस्फेट किंवा एकरी 75 किलो एसएसपी. * हेक्‍टरी 30 किलो पालाशसाठी 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा एकरी 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. ........................... झिंकची कमतरता असेल तर 25 किलो झिंक सल्फेट तर लोहाची कमतरता असेल तर 20 किलो फेरस सल्फेट द्यावे. लाल्या व्यवस्थापनासाठी कपाशीचे पीक फुलोऱ्यावर असताना दोन टक्के युरियाची फवारणी (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) करावी आणि बोंड भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के डीएपीची फवारणी (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) करावी किंवा एक टक्का युरिया आणि एक टक्का मॅग्नेशिअम सल्फेट (100 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी) फवारावे. ठिबक सिंचनाद्वारे खते द्यावयाचे झाल्यास संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे आणि नत्र आणि पालाश पाच हप्त्यांत विभागणी करून द्यावे. विद्राव्य खते वापरणे योग्य. येथे तक्‍ता नं. 1 आहे (विद्राव्य स्फुरद खत असेल तर चार हप्त्यांत आणि सिंगल सुपर फॉस्फेट देणार असाल तर पेरणीच्या वेळी द्यावे.) पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन ः विदर्भात कोरडवाहू स्थितीत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धतीवर टोकणी करावी. कारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत पावसामध्ये 10-15 दिवसांचा खंड पडतो. त्यासाठी सुरवातीपासून पावसाचे पाणी मुरेल यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ओलावा टिकवणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्याकरिता पेरणीच्या वेळी कुजलेले शेणखत अथवा गांडूळ खत द्यावे. उताराला आडवी नांगरटी, पेरणी करावी किंवा पावसाचे पाणी मुरवण्यास 20 x 20 मीटर चौकोनी वाफे नांगरटीने तयार करावे. सर्वांत सोपा उपाय म्हणजे पीक 30 दिवसांचे झाल्यावर डवऱ्याच्या जानकुड्याला दोरी बांधून सऱ्या पाडाव्या. त्यामुळे पावसाचे पाणी मुरवण्यास आणि जास्तीचे पाणी काढून टाकण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे संरक्षित ओलित देण्यासाठी उपयोग होईल. कपाशीच्या दोन तासांमध्ये हिरवळीचे पीक बोरू पेरून 30 दिवसांनी कापून त्याचा वापर केल्याने मल्चिंग होऊन ओलावा टिकविण्यास मदत होते. संरक्षित ओलिताचे व्यवस्थापन ः पीक फुलावर असताना आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत पिकाला ताण पडू नये म्हणून संरक्षित ओलित द्यावे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एक सरी आड पाणी द्यावे कारण कमी पाण्यात जास्त क्षेत्रावर ओलित करणे शक्‍य होईल. बोंड उमलले की पाणी देऊ नये. ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन ः ठिबक सिंचनामुळे उत्पादनात दुप्पट फरक पडतो. पाण्याची बचत 50 टक्के तर खतामध्ये 25 टक्के होते. दुप्पट होते. दुप्पट क्षेत्रात लागवड करता येते. जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याची गरज आणि ड्रीपरची प्रवाह क्षमता, लोड शेडिंग पाहून माहेवारी लागणारे पाणी लिटर, प्रति झाडामध्ये दिले आहे. दररोज शक्‍य नसेल तर एक दिवसा आड द्यावे तेव्हा दुप्पट पाणी द्यावे. माहेवारी ठिबक सिंचनाद्वारे लागणारे पाणी (लिटर/दिवस/झाड) येथे तक्‍ता नं. 2 आहे पावसाळ्यात खंड पडल्यास ड्रीपर सुरू करावा, अन्यथा गरज नाही. तण व्यवस्थापन ः पीक व तण यांच्यात स्पर्धा सुरवातीच्या 60 दिवसांपर्यंत असतो. बीटी वाणाला लवकर फुले येणे आणि ती पक्व होत असल्याने अन्नद्रव्यांची स्पर्धा कमी करण्यासाठी तण व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्याकरिता दोन डवरणी आणि एक निंदणी गरजेचे आहे. तण नियंत्रणासाठी उगवणपूर्व तणनाशक पेंडिमेथिलीन (30 ईसी) 50 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पेरणीच्या दिवशी किंवा पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी फवारावे. एक एकरासाठी 250 लिटर पाणी आणि 1250 मि.लि.. तणनाशक लागेल. सुमारे 20 ते 25 दिवस तण नियंत्रण होते. त्यानंतर डवरणी करावी. सतत पावसाचे दिवस असेल तर पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांपर्यंत उगवणपश्‍चात तणनाशक क्विझालोफोप इथाईल (5 ईसी) 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी वापरून गवत वर्गीय तणांचे व्यवस्थापन करता येतो. एक एकरासाठी 125 लिटर पाणी आणि 250 मि.लि. हे तणनाशक लागेल. तण नाशकाच्या द्रावणात स्टिकर 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात अवश्‍य टाकावे. सर्वच तणे या उपायातून नियंत्रित होत नसल्याने फवारणीनंतर 20-25 दिवसांनी हलके निंदण किंवा डवरणी करावी. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करावा. डॉ. बी. आर. पाटील, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, मो. नं. 09657725801 डॉ. आ. न. पसलावार, कृषी विद्यावेत्ता, मो. नं. 09822220272 कापूस संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा