मंगळवार, २९ मे, २०१२

अनुभवा आधारे निवडा कपाशीचा वाण

कपाशी लागवडीपूर्वी वाण निवडताना शेतकऱ्यांनी एकाच वाणाच्या मागे न लागता अनुभवाच्या आधारे बीटी वाणांची निवड करावी. स्थानिक परिस्थितीत तग धरून उत्पादनात सातत्य असणारे व व्यापारी गुणधर्म यासोबतच कीड व रोगांना अंगभूत प्रतिरोध असणाऱ्या वाणांची निवड महत्त्वाची ठरते. तसेच बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर येणारे वाण निवडावेत. कापूस पिकाची लागवड मुख्यत्वेकरून कोरडवाहू क्षेत्रावर केली जाते. जसजसा खरीप हंगाम जवळ येऊ लागतो, तसतशी शेतकऱ्यांची लगबग चालू होते. पूर्वमशागतीची कामे, बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडते. त्यातच शेतकऱ्यांचा विशिष्ट प्रकारच्या वाणाकडे असलेला ओढा निर्माण होतो. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीलाच त्रास होण्याची शक्‍यता असते. वाण निवडताना ः वाण निवडताना शेतकऱ्यांनी एकाच वाणाच्या मागे न लागता अनुभवाच्या आधारे बीटी वाणांची निवड करावी. आज बाजारात विविध प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. परंतु शेतकऱ्यांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या वाणांबद्दल जास्त आकर्षण आहे. हे विशिष्ट वाण उत्पादकतेत सरस असतील परंतु योग्य व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांनी इतरही वाणांद्वारे त्यांच्या इतकेच उत्पादन मिळविणे शक्‍य आहे. विद्यापीठात झालेल्या विविध चाचण्यांनुसार बाजारात उपलब्ध असलेले अनेक वाण सरस आढळून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वाणाचा आग्रह न करता उपलब्ध असलेल्या वाणांची लागवड करून त्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे व अपेक्षित उत्पादन घ्यावे. पेरणीच्या वेळी बियाण्याची पिशवी बाजूस फोडून पेरणी करावी मात्र बियाणे खरेदी केल्याची पक्की पावती व पिशवीतील थोडे बियाणे व पिशवी टॅगसहित काही दिवसांपर्यंत जपून ठेवावी. इतर नियोजनातील महत्त्वाचे ः - इतर नियोजनामध्ये उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे किडीच्या सुप्तावस्था वर येऊन उन्हाने नष्ट होतील किंवा पक्षी त्यांना वेचून खातील. तसेच खालच्या भरातील अन्नद्रव्ये पिकासाठी उपलब्ध होतील. - शेताच्या जवळपास पऱ्हाटींचा ढीग लावू नये व त्या जून महिन्यापूर्वी जाळून टाकाव्यात. - बांध ताण विरहित ठेवावेत जेणेकरून पर्यायी खाद्य वनस्पतीचा नायनाट होईल. - लागवडीकरिता हलकी चोपण, पाणथळ जमीन न निवडता मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. - एकाच जमिनीवर सतत कपाशीचेच पीक न घेता पिकाची फेरपालट करावी. ज्या शेतात मागच्या वर्षी कापूस, हरभरा, तूर व भेंडी यासारखी पिके होती तिथे कापूस घेण्याचे टाळावे. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते व किडीचा प्रादुर्भावही कमी होतो. - मॉन्सूनपूर्व पावसानंतर दोनदा वखरणी (जांभूळवाही) करून जमीन समतल करावी जेणेकरून झाडांची योग्य संख्या राखता येईल. - कोरडवाहू कापसाची लागवड मॉन्सूनचा चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी. संपूर्ण गावाची लागवड दोन ते तीन दिवसांतच उरकावी. - कोणत्याही परिस्थितीत 15 जुलैनंतर लागवड करू नये. कारण त्यानंतर पेरणी केल्यास एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एक क्विंटलपर्यंत घट होऊ शकते. हेक्‍टरी झाडांची संख्या योग्य ठेवा ः हेक्‍टरी झाडांची योग्य संख्या हा कपाशीचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. शिफारशीनुसार दोन ओळींतील व दोन झाडांतील अंतर ठेवून हेक्‍टरी झाडांची योग्य संख्या ठेवावी. यामुळे कोरडवाहू कपाशीमध्ये प्रति हेक्‍टरी 18518 झाडांची संख्या राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरडवाहू लागवडीकरिता 4 x 1.5 फूट (120 x 45 सें.मी.) किंवा 3 x 2 फूट (90 x 60 सें.मी.) व बागायतीकरिता 5 x 1 फूट (150 x 30 सें.मी.) अथवा पट्टा पद्धतीत 4-2 x 2 फूट हे अंतर ठेवावे. पिकाची विरळणी करून एका ठिकाणी फक्त दोन जोमदार टवटवीत रोपटे ठेवावेत. शेताच्या कडेने लावावे रेफ्युजी बियाणे ः कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यांसारखी आंतरपिके/मिश्रपिके तसेच कपाशीभोवती झेंडू व एरंडी या सापळा पिकांची शेताच्या कडेने एक ओळ घ्यावी. कपाशीमध्ये आंतरपीक घेताना त्या पिकाच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. बीटी कपाशीतील संभाव्य प्रतिकार क्षमतेच्या प्रतिरोधाचे नियोजन करण्याकरिता बियाण्यासोबत मिळणाऱ्या संरक्षण (रेफ्युजी) बियाण्याची मुख्य शेताच्या कडेने लागवड करणे गरजेचे आहे. बीजप्रक्रिया ः पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करणारे व स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अतिरिक्त नत्राचा वापर टाळावा. बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्‍लोप्रीडची प्रक्रिया केलेली असते, परंतु जर केलेली नसल्यास बियाण्यास इमिडाक्‍लोप्रीड (70 टक्के) 7 ग्रॅम किंवा थायामिथोक्‍झाम (70 टक्के) 4.3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या बरोबरच कार्बेन्डाझीम 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी शेताच्या सभोवताली तुरीची एक ओळ लावावी व पर्यायी यजमान वनस्पतीचा नाश करावा. खत व्यवस्थापन ः खत व्यवस्थापनाकरिता जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे व त्यानुसार खताच्या मात्रा ठरवाव्यात कपाशीमध्ये कोरडवाहूकरिता 120ः60ः60 किलो प्रति हेक्‍टरी व बागायतीकरिता 150ः75ः75 किलो प्रति हेक्‍टरी नत्र, स्फुरद व पालाश या खतांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरडवाहूमध्ये 50 टक्के नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी व उरलेले नत्र (50 टक्के) लागवडीनंतर 30 दिवसांनी तर बागायतीमध्ये 20 टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी तर उरलेले 80 टक्के नत्र समान दोन हप्त्यांत 30 व 60 दिवसांनी घ्यावे. रासायनिक खताबरोबरच पेरणीपूर्वी 10 ते 15 बैलगाड्या (5 ते 10 टन) कुजलेले शेणखत प्रति हेक्‍टर या प्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे. तसेच मुख्य खतासोबतच मॅग्नेशिअम सल्फेट 10 कि.ग्रॅ., गंधक 10 कि.ग्रॅ., झिंक सल्फेट 6 कि.ग्रॅ. व बोरॉन 2 कि.ग्रॅ.. ही सूक्ष्म मूलद्रव्ये प्रति एकर या प्रमाणात द्यावीत. तण व्यवस्थापन ः तण व्यवस्थापनाकरिता लागवडीनंतर परंतु उगवणीपूर्वी पेंडामिथॅलीन एक लिटर प्रति एकर किंवा लागवडीनंतर 15 ते 30 दिवसांदरम्यान क्‍युझॉलोफॉपइथिल 170 मि.लि. प्रति एकर या प्रमाणात पाण्यात मिसळून तणांवर फवारावे. पिकाच्या सुरवातीचे अवस्थेत 3,6,9,12 आठवड्यांनी कोळपणी व गरजेनुसार खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या पूरक वनस्पतींचा नाश करावा. यामुळे तणांचा बंदोबस्त तर होतो. परंतु जमिनीत हवा खेळती राहते, जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकवून ठेवणे, पिकाला मातीची भर हे फायदेही मिळतात. शेवटच्या कोळपणीच्या वेळी कोळप्याच्या जानोळ्यास दोरी अथवा पोते बांधून उथळ सऱ्या पाडाव्यात जेणेकरून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरेल. पाण्याचे नियोजन ः कोरडवाहू कपाशीमध्येही शेततळे, संरक्षित पाणी यांच्या माध्यमातून कपाशी पिकाचे उत्पादन वाढविता येते. पावसाचा दीर्घ खंड पडल्यास संरक्षित पाणी द्यावे. पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये (उदा. पाने, बोंड लागणे, बोंडे पक्वता इ.) पाण्याचा ताण पडू नये, याची काळजी घ्यावी. हे शक्‍य नसल्यास आच्छादनांचा वापर, दोन ओळीतून सऱ्या ओढणे, हलक्‍या कोळपण्याद्वारे ओलावा टिकवून ठेवता येतो. -------------------- संपर्क ः 02452-229000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा