शनिवार, १४ एप्रिल, २०१२

वाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक समृद्धी

नाशिक जिल्ह्यातील इतिहासाचा साक्षीदार असलेल्या तिळवण किल्ल्याच्या पायथ्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या तिळवण (ता. बागलाण) येथील शेतकरी रामदास गुंजाळ यांनी डोंगर उतारावरील खडकाळ माळरानावर कमी पाण्यात नियोजनबद्ध व्यवस्थापनातून केलेली डाळिंब शेती प्रेरणादायी अशीच आहे. 18 महिन्यांच्या झाडावर बहर नियोजन करून, 26 व्या महिन्यात उत्कृष्ट प्रतीचे डाळिंब उत्पादन घेऊन त्यांनी आर्थिक समृद्धी मिळविली आहे. बागलाण तालुक्‍यातील तिळवण येथे रामदास भादू गुंजाळ यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. पैकी दोन एकर शेती खाचखळग्यांची असून, जमिनीच्या एका बाजूने नाला व पाझरतलाव आहे. त्यामुळे पावसाळ्यात निम्मे क्षेत्र पाण्याखाली जात असे. दोन एकर शेती डोंगर उताराची, मुरमाड होती. अशाही परिस्थितीत जिद्द न सोडता त्याच जमिनीवर यशस्वी शेती करण्याचा चंग त्यांनी बांधला. डोंगर उतारावरील जमिनीचे सपाटीकरण करून धरणातील गाळ शेतात टाकला. शेतात मका, बाजरी, कांदा, भुईमूग ही पारंपरिक पिके घ्यायला सुरवात केली; परंतु या पिकांतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. काही वेळेस तर या पिकांच्या व्यवस्थापनावर केलेला उत्पादन खर्चही सुटत नव्हता. या पिकांऐवजी त्यांनी मिरची, ऊस, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर असा पीकबदलही दोन ते तीन वर्षे करून पाहिला; मात्र ही पिके घेतानाही खर्च व केलेल्या कष्टांचा ताळा जुळवून फायदा मात्र होत नव्हता. याला पर्याय म्हणून सन 2003 मध्ये दोन एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय गुंजाळ यांनी घेतला. याविषयी रामदास गुंजाळ म्हणाले, कसमादे पट्ट्यात डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु या जमिनीत पहिल्यांदा लागवड केल्याने पिकाचे जमेल तितके चांगले व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यास यश मिळून बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. खडकाळ, मुरमाड जमिनीत डाळिंब चांगले येते हे लक्षात आल्यावर उर्वरित दोन एकर जमिनीचेही सपाटीकरण करून तेथेही डाळिंबाची लागवड केली. एकूण चार एकर क्षेत्रातून पूर्वीच्या तुलनेत चांगले पैसे मिळाले. अवघे दहावीपर्यंत शिकलेल्या गुंजाळ यांनी बागेचे काटेकोर नियोजन व अपार कष्टांतून शेतीतूनच आर्थिक स्तर उंचावला. मिळालेल्या पैशांतून चार एकर शेती खरेदी केली, त्यातही डाळिंब लागवडीचे नियोजन केले. नवीन बागेचे असे केले व्यवस्थापन ः या शेतात डाळिंबाच्या सुधारित पद्धतीने लागवडीवर भर दिला. या बागेच्या व्यवस्थापनाविषयी गुंजाळ म्हणाले, की लागवडीपूर्वीपासूनच्या तयारीवर मेहनत घेतली. शेताची चांगली मशागत केली. 10 x 12 फूट अंतरावर खड्डे खोदून उन्हात तापू दिले. त्यानंतर धरणातील गाळ, शेणखत, निंबोळी पेंड, सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरले. ऑगस्ट 2009 मध्ये आरक्ता जातीच्या रोपांची लागवड केली. बागेत एकूण 1550 झाडे बसली. लागवडीनंतर चार महिन्यांत झाडांची पहिली छाटणी केली. बागेची चांगली निगा राखली. दहाव्या महिन्यात झाडांची पुन्हा दुसरी छाटणी केली. झाड कमी दिवसांत चांगल्या प्रकारे विकसित व सक्षम झाल्यामुळे या बागेतून पहिला बहर घेण्याचा प्रयोग करावा असे ठरवले. 18 व्या महिन्यात तिसरी छाटणी केली. साधारण नवीन लागवड झालेल्या झाडांवर दोन ते अडीच वर्षांनंतरच बहर धरला जातो; मात्र झाडांचा आकार व स्थिती चांगली असल्यामुळे अनुभवी शेतकरी तसेच कृषी विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने या झाडांवर बहर धरण्याचे नियोजन केले व त्यानुसार अंमलबजावणीस सुरवात केली. बागेची छाटणी झाल्यावर बागेतील प्रत्येक झाडाला 20 किलो शेणखत, निंबोळी पेंड, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 300 ग्रॅम 10ः26ः26 खत; तसेच योग्य त्या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिली. झाडांना दिले गरजेनुसार पाणी ः सुरवातीला प्रत्येक झाडाला गरजेनुसार ठिबक सिंचनाद्वारे सुमारे 50 ते 55 लिटर पाणी दिले. त्यानंतर दहा दिवसांनी 15 ते 20 लिटर प्रति झाड या प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन ठेवले. झाडाला फळे असताना प्रति झाड दिवसाआड 35 ते 40 लिटर पाणी देण्यात येत होते. कीड-रोगांसाठी आधीच केले प्रतिबंधात्मक उपाय ः कीड-रोग येऊ नये म्हणून आधीच काळजी घेतली. पानगळ झाल्यानंतर बोर्डोमिश्रणाची फवारणी केली, त्यानंतर लगेच कीटकनाशकांची फवारणी केली. वेळीच प्रतिबंधात्मक फवारणी केल्यामुळे मावा, फुलकिडी यांचा प्रादुर्भाव जाणवला नाही; तसेच वेळोवेळी बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या. आमच्या भागात तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने त्याचे विशेष काही व्यवस्थापन करावे लागले नाही; परंतु झाड सशक्त ठेवण्यावर लक्ष दिले, त्यामुळे ते कुठल्याही रोगाला बळी पडले नाही, असे गुंजाळ म्हणाले. मिळाले दर्जेदार उत्पादन ः बागेतील प्रत्येक झाडाला साधारणतः 700 ते 800 ग्रॅमपर्यंत फळे लगडल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. चार एकरांतून सरासरी 24 टन उत्पादन मिळाले. डाळिंबाला नाशिक बाजार समितीत सरासरी 100 रु. प्रति किलोपर्यंत बाजारभाव मिळाला. दर्जेदार फळे असल्याने बाजार समितीतही सर्वच व्यापाऱ्यांची या मालाला चांगली पसंती मिळाली. आसपासच्या शेतकऱ्यांनीही बागेस भेटी दिल्या. या गोष्टींकडे खास लक्ष दिले ः - लागवडीपूर्वी माती - पाणी परीक्षण केले. - पाण्याचे नियोजन काटेकोरपणे ठेवले. - पाणी कमी असल्याने उपलब्ध पाणी विभागून दिले, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवला. - ओलाव्यामुळे दिलेली खते जास्त खोलीवर गेली नाहीत, ती पुरेपूर झाडाला मिळाली. - झाडाच्या गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नियोजन केले. खर्च व उत्पन्नाचा ताळेबंद ः एक वर्षाच्या बहर नियोजनासाठी चार एकरवर एकूण एक लाख 27 हजार 445 रुपये खर्च झाला. यात शेणखत, निंदणी, छाटणी, फवारणी, काढणी या बाबींचा समावेश आहे. एकूण 24 टन उत्पादनातून 24 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, त्यातून झालेला खर्च वजा जाता सुमारे 22 लाख रुपये नफा झाला. बागेची वेळोवेळी घेतलेली काळजी व योग्य नियोजनामुळे लागवडीनंतर अवघ्या पंचवीस ते सव्वीस महिन्यांच्या झाडांना फळे घेण्याचा यशस्वी प्रयोग गुंजाळ यांनी केला. याकामी त्यांना त्यांचा मुलगा दीपक यासह कुटुंबीयांची चांगली मदत मिळाली आहे. डाळिंबाबरोबरच आदर्श रोपवाटिकाही ः डाळिंब शेतीबरोबरच गुंजाळ यांनी डाळिंबाची रोपवाटिकाही तयार केली आहे. या रोपवाटिकेस शासकीय परवाना मिळाला आहे. जुन्या बागेतील 500 डाळिंबाच्या झाडांवर गेल्या चार - पाच वर्षांपासून कलम (गुटी) तयार करून ते घरीच डाळिंब रोपे तयार करतात. कलम तयार करणाऱ्या कामगारांना कलम तयार करण्यासाठी लागणारे शैवाल, प्लॅस्टिक कागद, सुतळी, रोपे ठेवण्यासाठी पिशवी स्वतः पुरवून कलम बांधणी करून घेतात. ही गुटी प्रत्यक्ष झाडावर दोन महिने ठेवली जाते व त्यानंतर झाडावरून उतरवून (कट) पिशवीत टाकून त्यांना पाणी दिले जाते. पिशवीत कलम भरल्यावर दीड महिन्यात या कलमास फुटवा (पालवी) येतो. त्यानंतर रोप विक्रीस तयार होते. एका वेळेस 40 ते 45 हजार रोपे तयार होतात. एक डाळिंबाचे रोप 12 ते 15 रुपयांना विक्री होते. रोपवाटिकेतून गुंजाळ यांना पाच ते सहा महिन्यांत पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळते. रोप घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतातच डाळिंबाचा दर्जा पाहायला मिळतो. गुटी बांधलेले झाडही चांगल्या दर्जाचे असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी रोपांसाठी आगाऊ नोंदणी करतात. संपर्क ः रामदास गुंजाळ, 8275021470

२ टिप्पण्या:

  1. डाळिंब =जमिनीची निवड ,लागवड,संगोपन ,डाळिंबाच्या वाणांची वैशिष्ठ्ये,डाळिंब कीड-रोग यांचे नियंत्रण,बहर व्यवस्थापन ,छाटणी , विद्राव्य खते, औषध फवारणी ,विविध हवामानातील काळजी, पाणी व्यवस्थापन, निर्यातीचे बारकावे या सर्व बाबींसाठी भेटा अथवा संपर्क साधा .डाळिंब तज्ञ -शशिकांत अहिरे सर यांना मो. नंबर .8055393399

    उत्तर द्याहटवा
  2. डाळिंब =जमिनीची निवड ,लागवड,संगोपन ,डाळिंबाच्या वाणांची वैशिष्ठ्ये,डाळिंब कीड-रोग यांचे नियंत्रण,बहर व्यवस्थापन ,छाटणी , विद्राव्य खते, औषध फवारणी ,विविध हवामानातील काळजी, पाणी व्यवस्थापन, निर्यातीचे बारकावे या सर्व बाबींसाठी भेटा अथवा संपर्क साधा .डाळिंब तज्ञ -शशिकांत अहिरे सर यांना मो. नंबर .8055393399

    उत्तर द्याहटवा