रविवार, २२ एप्रिल, २०१२

दूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन

मुंबई (प्रतिनिधी) ः दूध भेसळ आणि अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नवीन हेल्पलाइन सुरू केली आहे. 1800222262 या क्रमांकावर भेसळीबाबत तक्रार नोंदवता येईल, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी (ता. 17) विधान परिषदेत केली. राज्यातील सहकारी, खासगी दूध डेअरी दूध संघ यांच्यामार्फत वितरित होणाऱ्या दुधामध्ये युरिया, ग्लुकोज, चरबी, वॉशिंग पावडर मिसळून 65 टक्के दूध भेसळयुक्त वितरित होत असल्याचे आढळून आले आहे. भेसळमुक्त दूधपुरवठ्यासाठी शासनाने उपाययोजना करावी अशी मागणी विधान परिषद सदस्यांनी नियम 97 अन्वये उपस्थित अल्पकालीन चर्चेत करण्यात आली होती. या वेळी झालेल्या चर्चेत आमदार विनायक मेटे आणि उषा दराडे यांनी सहभाग घेतला. या वेळी केंद्र सरकारने भेसळ रोखण्यासाठी 1800112100 क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. उत्तरामध्ये मंत्री सतेज पाटील म्हणाले, ""5 ऑगस्ट 2011पासून केंद्र सरकार नवा अन्नसुरक्षितता कायदा राबवत आहे, त्यानुसार दूध आणि अन्न वितरकांना नोंदणी आणि परवाने अनिवार्य केले आहेत. राज्यात एक लाख 40 हजार अन्न आणि दूध वितरकांची नोंदणी होऊन, सरकारला 37 कोटींचा महसूल मिळाला आहे.'' येत्या 27 एप्रिल रोजी राज्यातील सर्व दूध उत्पादक संघांची बैठक आयोजित केली आहे. 1 जून रोजी दुग्धदिन असतो. त्या दिवसापासून राज्यभर विशेष मोहीम राबवून दूध भेसळ रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे, असे मंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले. दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष पद्धतीच्या रंग बदलणाऱ्या हवाबंद पिशव्या वापरण्याच्या सूचना दूध उत्पादकांना देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी चर्चेच्या उत्तरात सांगितले. भेसळीची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा आणि मोबाईल व्हॅन खरेदीसाठी शासनाकडे 360 कोटींचा प्रस्ताव सादर केला असून, राज्यातील दूध भेसळीवर कठोर उपाय करण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शासनाने कडक धोरण स्वीकारल्याने बीड जिल्ह्यातील दूध संकलन 13 लाख लिटरवरून दहा लाख लिटरपर्यंत घटले आहे, दुधामध्ये प्रामुख्याने पाण्याचीच भेसळ होत असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा