रविवार, १५ एप्रिल, २०१२

हरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी

यवतमाळ जिल्ह्यातील लाख रायाजी (ता. दिग्रस) येथील युवा शेतकरी शेख रफिक यांनी शेती सोडून दुसरा व्यवसाय करायचे ठरविले होते. मात्र "ऍग्रोवन'मधील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून संकटाशी सामना करीत मिळविलेल्या यशामुळे ते प्रभावित झाले. पुन्हा पक्का निर्धार करून शेतीतच नशीब आजमावण्याकरिता पाऊल टाकले. त्यातून यश त्यांच्या पदरी पडले. हरभऱ्याचे एकरी पंधरा क्विंटल उत्पादनातून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाने त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेती सोडण्याचा विचार पक्‍का करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटा-मोठा व्यवसाय सुरू करणार होतो. त्याकरिता इतर व्यवसायाबाबतची माहिती गोळा करणेही सुरू केले. परंतु व्यवसाय करणेसुद्धा सोपे नव्हते. त्याबाबत विचार करत असतानाच "ऍग्रोवन'मधील यशोगाथांतून प्रेरणा मिळाली. पुन्हा नव्या जोमाने शेतीकडे वळलो. हरभरा पिकातील उत्पादनातून नवसंजीवनी मिळाली. दिग्रस (जि. यवतमाळ) तालुक्‍यातील लाख रायाजी येथील युवा शेतकरी शेख रफिक ऊर्फ रब्बू शेख जिलाणी आपल्याला मिळालेल्या यशाविषयी सांगत होते. रफिक यांची लाख रायाजी या गावी एकत्रित कुटुंबाची एकूण 50 एकर जमीन आहे. पैकी 15 एकर त्यांच्या वाट्याला आली आहे. शेतात पाण्याची सोय म्हणून विहीर व कालवा आहे. जमीन काळी कसदार, भारी, पाण्याचा निचरा होणारी आहे. अनेक वर्षांपासून ते या जमिनीत खरिपात सोयाबीन, कापूस तर रब्बीत गहू पीक घेत असत. शेतीविषयी माहिती देताना पुढे ते म्हणाले, की पूर्वी उत्पादन खर्चाच्या तुलनेत पिकातून फार काही मिळत नसे. मजूर खर्चही परवडत नव्हता. मागील वर्षी कापूस लावला होता. परंतु वेचणीसाठी मजुरीच जास्त गेली. त्यातही कापसाला भाव मिळाला नाही. शेवटचा पर्याय म्हणून सोयाबीनची लागवड केली. त्यालाही भाव नसल्याने हे पीक परवडले नाही. त्यामुळे ही शेती दुसऱ्याला मक्‍त्याने द्यावी आणि दुसरा व्यवसाय सुरू करावा असा विचार केला होता. मात्र "ऍग्रोवन'मधील ऊस, मिरची, डाळिंब पिकातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून आपणही असेच काहीतरी करावे म्हणून पुन्हा शेतीत प्रयत्न सुरू केला. घेतला हरभरा लागवडीचा निर्णय ः रोज सायंकाळी आम्ही मित्रमंडळी एकत्रित येऊन चर्चा करतो. त्यात विषय झाला, की रब्बीमध्ये गहू पीक लावण्यापेक्षा हरभऱ्याची लागवड फायदेशीर ठरते. कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळते. तसेच गव्हाला हमीभाव कमी असून त्या तुलनेत हरभऱ्याला शासनाचा 2800 रुपये हमीभाव आहे. त्यामुळे गव्हापेक्षा हरभरा परवडतो. उद्यानपंडित शेतकरी रामकृष्ण तायडे यांनी हरभरा वाणांच्या निवडीबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार 13 एकरावर हरभरा लागवडीचा निर्णय घेतला. असे केले पीक व्यवस्थापन ः रफीक पुढे म्हणाले, की खरिपातील सोयाबीन पिकाची काढणी केल्यानंतर शेताची चांगली मशागत केली. सोयाबीनमुळे जमिनीचा बेवड चांगला राहिला. सामू सात ते साडेसात झाला. मशागत करताना तीनफळी ट्रॅक्‍टरने नांगरणी व कल्टीव्हेटरने आडवी- उभी डवरणी करून जमीन भुसभुशीत केली. हरभऱ्याच्या "जाकी, विशाल आणि दिग्विजय' वाणांची निवड केली. लागवडीपूर्वी बियाण्यास रायझोबियम, ट्रायकोडर्मा व ह्युमीक ऍसिडची प्रक्रिया केली. नोव्हेंबर महिन्याच्या पाच तारखेपासून पेरणीला सुरवात केली. दोन ओळींतील अंतर सव्वा फूट ठेवून यंत्राच्या साह्याने पेरणी केली. यामध्ये सात एकरावर "जाकी', दोन एकर "विशाल' आणि चार एकर क्षेत्रावर "दिग्विजय' वाणाची लागवड केली. एकरी 30 किलो बियाणे वापरले. पेरणीसोबत 14ः35ः14 एकरी पन्नास किलो मिश्रखत दिले. पूर्वी उन्हाळ्यात भुईमूग पिकासाठी तुषार संच घेतला होता. त्याच तुषार संचाचा वापर करून आवश्‍यकतेनुसार पिकाचे पाणी व्यवस्थापन केले. विहिरीत पाणी मुबलक असल्याने सिंचनाकरिता कोणतीही अडचण आली नाही. दरम्यान, वेळोवेळी निंदन व डवरणी करून पिकाची निगा राखली. पेरणीनंतर एक महिन्याने पिकाला एकरी 30 किलो युरिया दिला. तसेच बहरलेल्या पिकाला फुले दिसायला सुरवात होताच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली. या वेळीच घाटे अळी आली होती, त्यासाठी लगेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने प्रतिबंधात्मक फवारणी केली. पीक हातातून जायचे वाचले ः पिकाचे व्यवस्थापन करताना एक चूक झाली. मध्यंतरी आठ ते दहा दिवस ढगाळ वातावरण होते. त्या वेळी एक पाणी जास्त दिले गेले. त्याचा परिणाम असा झाला पिकाची कायिक वाढ जास्त झाली. अनेक शेतकऱ्यांनी पीक पाहून आता पिकाला घाटे लागणार नाहीत, पीक वाया गेले असा तर्क काढला. त्यामुळे नाराज झालो. परंतु त्याचवेळी तज्ज्ञ मित्र डॉ. अशोक तायडे, पांडुरंग गुघाने व सुभाष पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. मार्गदर्शनानुसार पिकावर वाढनियंत्रकाची फवारणी केली. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही फवारणी केली. त्यामुळे हातातून गेलेले हरभऱ्याचे पीक पुन्हा जोमदार दिसू लागले. हरभऱ्याला भरपूर प्रमाणात घाटे लगडून पीक परिपक्व झाले. प्रत्येक झाडाला कमीत कमी तीनशे तर जास्तीत जास्त 380 घाटे लगडले होते. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी हरभरा पिकाची पाहणी करण्यास आले होते. पिकाच्या व्यवस्थापनाविषयी त्यांनी माहिती घेतली. तालुका कृषी अधिकारी अ. आ. कुळकर्णी, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण व प्रगतिशील शेतकरी अमृत महिंद्रे यांनी प्रत्यक्ष घाटे मोजून खात्री करून घेतली. उत्पादन, उत्पन्नातील यश ः हरभऱ्याची मळणी होऊन सात एकरातील "जाकी' वाणाचे एकरी 14.5 क्विंटल प्रमाणे 101.5 क्विंटल, दोन एकरातील "विशाल' वाणाचे एकरी 16 क्विंटल प्रमाणे 32 क्विंटल, तर चार एकर "दिग्विजय' वाणाचे एकरी 15 क्विंटलप्रमाणे 60 क्विंटल असे 13 एकरात एकूण 193.5 क्विंटल उत्पादन मिळाले. एकरी सरासरी 15 क्विंटल उत्पादन झाले. 3300 रुपये क्विंटलप्रमाणे एका एकरातील 15 क्विंटल हरभऱ्यातून 49,500 रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. एकरी उत्पादन खर्च 11550 रुपये वजा जाता एकरी 37,950 रुपये निव्वळ नफा मिळाला. 150 क्विंटल हरभऱ्याची विक्री केली आहे. आणखी 43.5 क्विंटल हरभरा शिल्लक आहे. भाव वाढल्यानंतरच उर्वरित हरभरा विकणार आहे. गव्हाला पर्यायी पीक म्हणून हरभऱ्याला पसंती दिल्याने त्यातून फायदा झाला. एकेकाळी शेतीपासून दूर जाण्याचा केलेला विचार मनातून कायमचा गेला असल्याचे मत रफीक यांनी व्यक्त केले. हरभऱ्याकरिता एकरी झालेला खर्च (रुपये) ः मशागत -------------------1500 बियाणे--------------------1200 पेरणी खर्च------------------400 मिश्रखत (14ः35ः14)------850 निंदणी---------------------1000 औषध फवारणी-------------1500 डवरणी-----------------------500 पिकास पाणी देणे व इतर खर्च----2000 कापणी-----------------------1000 मळणी------------------------1500 बाजारात विक्री करिता वाहतूक खर्च----100 एकूण खर्च----------------------- 11,550 हरभरा पिकाचे उत्तम व्यवस्थापन करून वेळेवर करावी लागणारी आंतरमशागत आणि पिकाच्या फुलोरा या वाढीच्या अवस्थेवेळी दाणे भरण्यासाठी वेळीच केलेले पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांची योग्य वेळी पूर्तता या बाबींमुळे पिकाची जोमदार वाढ झाली. त्यातून उत्पादन वाढीस मदत झाली. - अ. आ. कुळकर्णी, 7588590132 तालुका कृषी अधिकारी, दिग्रस पूर्वी नेमकी काय समस्या येत होती? - रफिक म्हणाले, की पूर्वी शेतीचे योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यामुळे पीक व्यवस्थापनात चूक व्हायची. कीडनाशकांबाबत माहिती नसल्याने त्यांच्या वेळेवर फवारण्या केल्या जात नव्हत्या. तुषार सिंचनही नव्हते. कापसाचे पीक परवडत नव्हते. मजुरांचीच जास्त समस्या होती. खतांचा खर्च जास्त व्हायचा. कापसात "लाल्या' विकृतीची समस्या जाणवायची. तसेच कापूस विकताना अडवणूक व्हायची. आता नेमके काय झाले? - शेतीमालाला भाव चांगले असल्याने नफ्याचे प्रमाण वाढले. "ऍग्रोवन'च्या माध्यमातून चांगले मार्गदर्शन मिळू लागले. त्यामुळे आता डाळिंब फळबाग करण्याचा विचार आहे. यशोगाथामधून डाळिंब पिकाविषयी वाचलेल्या शेतकऱ्याची भेट घेणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा