मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

जमिनीच्या प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जाती निवडा डॉ. शरद गडाख, डॉ. उत्तम चव्हाण Monday, September 05, 2011 AT 03:45 AM (IST) Tags: agrowan नवीन वाणांचा व तंत्रज्ञानाचा वापर जमिनीच्या प्रकारानुसार केल्यास रब्बी ज्वारीच्या उत्पादनात सर्वसाधारण 40-45 टक्‍क्‍यांनी वाढ होते. यासाठी शिफारशीत जातींची सुधारित पद्धतीने लागवड करणे आवश्‍यक आहे. अ) हलक्‍या जमिनीसाठी जाती : 1) फुले अनुराधा : अवर्षण प्रवण भागात हलक्‍या जमिनीसाठी हा वाण विकसित करण्यात आला आहे. पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस असून, अधिक अवर्षणास प्रतिकारक्षम आहे. या वाणाची भाकरी उत्कृष्ट चवदार असून, कडबा अधिक पौष्टिक व पाचक आहे. हा वाण खोडमाशी तसेच खडखड्या रोगास प्रतिकारक्षम असून, कोरडवाहू क्षेत्रामधून धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी आठ-दहा क्विंटल व कडबा 30 ते 35 क्विंटल मिळतो. 2) सिलेक्‍शन - 3 हा वाण हलक्‍या जमिनीमध्ये 105 ते 110 दिवसांत पक्व होतो तसेच अवर्षणास प्रतिकारक्षम आहे. या वाणाची भाकरी चवदार असून, कडबा पौष्टिक व अधिक पाचक आहे. या वाणाचे धान्य उत्पादन पाच ते सहा क्विंटल व कडब्याचे उत्पादन 15 ते 18 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. ब) मध्यम जमिनीसाठी जाती : 1) फुले चित्रा : ही जात अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारशीत केली आहे. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र आहेत. ही जात 105 ते 110 दिवसांत पक्व होते. या जातीच्या ज्वारीची भाकरी चांगल्या प्रतीची असून, कडब्याची प्रत सुद्धा उत्तम आहे. या जातीचे धान्य उत्पादन 20 ते 25 क्विंटल आणि कडबा उत्पादन 55 ते 60 क्विंटल मिळते. 2) फुले माऊली : ही जात 110 ते 115 दिवसांत पक्व होते. या जातीच्या ज्वारीच्या भाकरीची चव चांगली असून, कडबा पौष्टिक व चवदार आहे. या जातीचे धान्याचे उत्पादन मध्यम जमिनीत 15 ते 20 क्विंटल तर हलक्‍या जमिनीत सात ते आठ क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. कडब्याचे उत्पादन मध्यम जमिनीत 40 ते 50 क्विंटल तर हलक्‍या जमिनीत 20 ते 30 क्विंटल मिळते. क) भारी जमिनीसाठी जाती : 1) फुले वसुधा : ही जात भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. ही जात 116 ते 120 दिवसांत पक्व होते. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र व चमकदार आहेत. भाकरीची व कडब्याची प्रत चांगली असून, ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे. या जातीचे धान्य उत्पादन कोरडवाहूसाठी 24 ते 28 क्विंटल आणि बागायतीसाठी 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. तसेच कडब्याचे उत्पादन कोरडवाहूमध्ये 65 ते 70 क्विंटल व बागायतीमध्ये 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. 2) फुले यशोदा : ही जात 120 ते 125 दिवसांत काढणीस तयार होते. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र, चमकदार असून, त्याची भाकरी चवीला चांगली आहे. ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे. या जातीचे धान्याचे उत्पादन 25 ते 28 क्विंटल असून, कडब्याचे उत्पादन 60 ते 65 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. बागायतीमध्ये धान्य उत्पादन 30 ते 35 क्विंटल, तर कडब्याचे उत्पादन 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. 3) सी.एस.व्ही. 22 ही जात राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आलेली असून, ती भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायतीसाठी योग्य आहे. ही जात 116 ते 120 दिवसांत तयार होते. या जातीचे कोरडवाहूमध्ये धान्य उत्पादन 24 ते 28 क्विंटल, तर बागायतीमध्ये 30 ते 35 क्विंटल मिळते. कडब्याचे उत्पादन कोरडवाहूमध्ये 65 ते 70 क्विंटल, तर बागायतीमध्ये 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. ड) बागायती जमिनीसाठी जाती : 1) फुले रेवती : ही जात भारी जमिनीत बागायतीसाठी विकसित करण्यात आलेली आहे. या जातीस पाण्याच्या तीन ते चार पाळ्या पिकाच्या वाढीचा काळ, पोटरीत असताना, फुलोऱ्यात असताना व दाणे भरताना द्याव्या लागतात. या जातीस 118 ते 120 दिवस पक्व होण्यास लागतात. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे चमकदार असून, भाकरीची चवही उत्कृष्ट आहे. तसेच कडबा पौष्टिक असून, अधिक पाचक आहे. ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे. धान्य उत्पादन 40 ते 45 क्विंटल व कडबा उत्पादन 90 ते 100 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. 2) सी.एस.व्ही. 18 : या जातीस पाण्याच्या दोन ते तीन पाळ्या लागतात. ओलिताखाली अधिक उत्पादन देणारी, धान्याची व कडब्याची प्रत चांगली असणारी, मावा किडीस प्रतिकारक्षम असणारी ही जात 30 ते 35 क्विंटल धान्य व 70 ते 75 क्विंटल कडब्याचे उत्पादन प्रति हेक्‍टरी देते. शेतकरी बांधवास विनंती करण्यात येते, की आपल्या जमिनीच्या प्रकारानुसारच रब्बी ज्वारीच्या जातीचा वापर करा म्हणजे उत्पादनात वाढ होईल. ज्वारी सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संपर्क : 02426-243253

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा