गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

सुधारित पद्धतीने घ्या कांद्याचे उत्पादन

Monday, August 30, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: agro planning

कांदा हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक आहे, परंतु पिकाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीने केली जात असल्याने उत्पादनखर्च जास्त, कमी प्रतीचे उत्पादन व जास्त पाण्याचा वापर होतो. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीकडे लक्ष देताना जातींची निवड, लागवडीची पद्धत आणि पीक व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे.

जातींची निवड
हंगामानुसार मुख्यत्वे एन-53, फुले समर्थ, बसवंत-780, ऍग्रीफाऊंड डार्क रेड व लाईट रेड, अर्काकल्याण, अर्कानिकेतन व पुणे फुरसुंगी या जातींची लागवड करावी. कांदा उत्पादनासाठी बियाणे दर्जेदार व खात्रीशीर असावे. बियाण्याची उगवणक्षमता 15 दिवस अगोदर तपासून घ्यावी. किमान 70 टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे रोपे तयार करण्यासाठी वापरावे.

रोपवाटिका व्यवस्थापन
ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमिनीची चांगली मशागत करून रोपवाटिका करावी. पारंपरिक पद्धतीने रोपवाटिका तयार न करता योग्य आकाराचे गादीवाफे तयार करावेत. यासाठी निवड केलेल्या क्षेत्रावर 75 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून दोन सऱ्यांचा मिळून एक गादीवाफा करावा. तिसरी सरी तशीच सोडावी. शक्‍यतो एक मीटर रूंदीचा, 30 सें.मी. उंचीचा आणि गरजेनुसार लांबीचा गादीवाफा असावा. एक एकर कांदा लागवडीसाठी चार ते पाच गुंठे रोपवाटिका पुरेशी आहे. गादीवाफ्यावर 100 ग्रॅम निंबोळी पावडर, दोन ग्रॅम ट्रायकोडर्मा, तसेच प्रति चौरस मीटरप्रमाणे 25 ग्रॅम 19:19:19 खत मिसळून द्यावे.
गादीवाफ्यावर तीन बोट (पाच सें.मी.) अंतराने रेषा आखून द्यावे. गादीवाफ्यावर तीन बोट (पाच सें.मी.) अंतराने रेषा आखून एक सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे. एक ऐकर क्षेत्रासाठी तीन किलो बियाणे आवश्‍यक आहे. या बियाण्यास प्रत्येकी 75 ग्रॅम पी.एस.बी., ऍझोटोबॅक्‍टर व 25 ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करून पाच सें.मी. अंतरावरील ओळीत एक सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे. अशा पद्धतीने 45 ते 50 दिवसांचे नैसर्गिक जोमदार वाढीचे पुनर्लागवडीस रोप तयार होते. रोपास पाच-सहा पाने हरभऱ्याएवढी गाठ असणारे रोप पुनर्लागवडीस योग्य समजले जाते.

लागवड पद्धत
रोपवाटिकेवर रोपे तयार होत असताना लागवड क्षेत्राची पूर्ण मशागत सुरू करावी. फेरपालट असेल तर कांद्यापूर्वी सोयाबीन पीक घेणे फायद्याचे दिसून आले आहे. जमिनीची खोलवर नांगरट, काकरी पाळी, करून जमीन भुसभुशीत करावी. कांदा लागवड पारंपरिक वाफा व सरी पद्धतीने केली जाते. याऐवजी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करून व त्याचप्रमाणे पुनर्लागवड करण्यासाठी रानबांधणी करणे आवश्‍यक आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यामध्ये एकरी 100 किलो निंबोळी पावडर, ऍझोटोबॅक्‍टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी पाच किलो शेणखतामध्ये मिसळून द्यावेत. पुनर्लागवडीपूर्वी (नोव्हेंबर शेवटचा आडवडा) एकरी शंभर किलो 19:19:19 हे रासायनिक खत आणि दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये बैल पाभरीने पेरून द्यावे.

तुषार सिंचन वापर आणि रानबांधणी
दोन तुषार तोट्यातील अंतर 40 40 फूट असावे. प्रत्येक 40 फूट अंतरावर दोन फुटी दंड पाडण्यात यावेत. शिल्लक 38 फुटांमध्ये 7.50 फूट अंतरावर नांगरीने वरंबे पाडून पाच सारखे भाग पाडावेत. साधारणपणे 40 फूट लांबीवर आडवे एक फूट रुंदीचे वरंबे करावेत. अशा पद्धतीने 40 7.5 फूट अंतरावर (12 2.40 मी.) रुंद वाफे तयार करावेत. या पद्धतीचा अवलंब केल्यास रानबांधणीचा खर्च कमी होतो, दंड व वारे यामधील वाया जाणारी जागा लागवडीस उपयुक्त होते. पाणी, वीज व मजूर यावरील खर्चात बचत होते. रोपे लागवड करतांना दोन ओळींतील अंतर 15 सें.मी. आणि दोन रोपांमधील दहा सें.मी. ठेवावे.

खतांचे व्यवस्थापन
रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर 21 दिवसांनी एकरी अमोनियम सल्फेट 100 किलो आणि युरिया 50 किलो ही खतमात्रा जमिनीतून द्यावी. पुनर्लागवडीनंतर एक महिन्यांनी शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 19:19:19 फवारणी करावी. पुनर्लागवडीनंतर दोन महिने झाल्यानंतर 0:52:34 याची फवारणी करावी. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खतमात्रा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.

तुषार सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन
तुषार सिंचनाचा वापर करीत असल्यास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आठ ते नऊ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. सुरवातीला तीन तास पाणी द्यावे. त्यानंतर वाढीची अवस्था, पिकाची गरज, बाष्पीभवन यांचा विचार करून पाच तासांपर्यंत तुषार सिंचन संच चालविण्याचा काळ वाढवावा. शेवटी पुन्हा पाणी देण्याचा कालावधी कमी करावा. तुषार सिंचन संच गरजेपेक्षा अधिक वेळ चालवू नये. अन्यथा ओलावा व आर्द्रता वाढून जमिनीमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असते. तुषार सिंचन संच प्रति वर्ग सें.मी. दोन किलोग्रॅम दाबाने चालला पाहिजे. नोझलने एका मिनिटाला 33 ते 36 लिटर पाणी फेकले पाहिजे. पाण्याची त्रिज्ज्या 40 फूट मिळाली पाहिजे. दोन नोझलमधील अंतर 40 फूट व दोन शिफ्टिंगमधील अंतर 40 फूट अशा पद्धतीने सिंचन होणे आवश्‍यक आहे.

प्रवाही पद्धतीने पाण्याचे नियोजन -
कांदा पिकात पाण्याची गरज, पिकाची वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम, जमिनीच्या मगदुरा प्रमाणे अवलंबून असतो. कांद्याची मुळे दहा सें.मी. खोलीपर्यंतच पसरतात व 20 सें.मी. पेक्षा जास्त खोल जात नाहीत, त्यामुळे कांदा पिकाला पाणी देतांना 15 सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पाणी जाईल याची गरज भासत नाही. रोपे लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसांनी, उन्हाळी हंगामात सात ते आठ दिवसांनी आणि खरिपात तीन ते चार पाणी पाळ्या द्याव्यात. कांद्याची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर किंवा काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी बंद करावे.

पीक संरक्षण
कांदा पिकामध्ये मर, काळा करपा, पांढरी सड, मूळ कूज, जांभळा करपा, तपकिरी करपा आणि सूत्रकृमींचा प्रादुर्भाव दिसून येतो. हे लक्षात घेऊन वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियंत्रणाचे उपाय योजावेत. काळी बुरशी, निळी बुरशी, विटसरी सड, काजळी हे बुरशीजन्य रोग कांदा साठवणुकीत आढळून येतात, त्यामुळे कांद्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी काढणीपूर्व आणि काढणीपश्‍चात रोगांचे नियंत्रण आवश्‍यक आहे. कांद्यावर फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो, यासाठी वेळीच प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना करावी.
कृषी विभागतर्फे नगर जिल्ह्यामध्ये महापीक परिवार आणि "आत्मा'अंतर्गत शाश्‍वत कांदा उत्पादन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना शास्त्रोक्‍तपद्धतीने कांदा रोपवाटिका तयार करणे, सुधारित लागवड पद्धती, एकात्मिक खत व्यवस्थापन, कीड व रोगांचे नियंत्रण, तण व्यवस्थापन, पाणी नियोजन, कांदा काढणीपूर्व व पश्‍चात तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने कांदा उत्पादनवाढीसाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती...

कांदा काढणीपूर्व आणि काढणीपश्‍चात तंत्रज्ञान :
श्रकांदा पोसल्यानंतर काढणीपूर्वी 20 दिवस अगोदर पिकास पाणी तोडण्यात यावे. यामुळे कांदा पातीतील ऍबेसेसीक नावाचा द्रव पात्यामधून कंदामध्ये उतरतो, तेव्हा कांदा सुप्त अवस्थेत जाऊन साठवणूक करण्यासाठी पक्‍व होतो.
- माना पडण्यापूर्वी व शेवटच्या पाण्यानंतर शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- 50 टक्के माना पडल्यानंतर कांदा उपटून दोन-तीन दिवस पातीखाली झाकून ठेवणे.
- तीन दिवसांनंतर एक इंच देठ ठेवून कांदा कापणी करावी.
- दोन-तीन आठवडे चार फुटीच्या राशी तयार करून व कांदा पातीखाली झाकून ठेवावा.
- कांदा साठवणूक करावयाची असेल तर मुळे कापू नयेत.
- दोन-तीन आठवडे चार फूट रुंदीच्या राशी तयार करून कांदा पातीखाली झाकून ठेवावा.
- कांदा साठवणुकीअगोदर कांदा चाळीवर बुरशीनाशकांची फवारणी करण्यात यावी. शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेल्या कांदा चाळीमध्ये कांदा प्रतवारीनुसार (ग्रेड ए-बी) वेगळा साठवणे. साठवणूक करताना उंची चार फुटापेक्षा जास्त ठेवू नये.

उत्पादनात घट येण्याची कारणे
श्रचिबट, रेताड जमिनीचा कांदा लागवडीसाठी वापर केला जातो. शेतकरी लहान आकाराचे वाफे तयार करतात, त्यामुळे जवळपास 40 टक्के जमीन वाया जाते. कांदा लागवडीच्या वेळी, शिफारशीप्रमाणे पाळली जात नाही. शेणखत, गांडूळखत यांचा अत्यंत कमी वापर केला जातो. रासायनिक खतांचा आवश्‍यकतेपेक्षा जास्त वापर करतात. स्थानिक वाणांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल असतो. कांदा रोपवाटिका तयार करताना, बियाणे अत्यंत जास्त वापरतात. रोप जोमदार होत नाही. रोपवाटिकेवर रोपे 60 दिवसांपेक्षा जास्तच ठेवतात, यामुळे रोपवाढीस जोम मिळत नाही.
श्ररोपवाटिकेवर नत्र वापर प्रमाणापेक्षा जास्त करतात, त्यामुळे रोपांची कंदगाठ लागवडीयोग्य पोसली जात नाही. कांदा लागवडीअगोदर बीजप्रक्रिया करत नाहीत. कांदा लागवडीअगोदर रासायनिक खतांचा हप्ता दिला जात नाही, त्यामुळे खते पिकास वेळेवर उपलब्ध होत नाहीत. नत्राची मात्रा तीन समान हप्त्यात विभागून दिली जात नाही. गंधकाचा वापर केला जात नाही. आवश्‍यकतेप्रमाणे सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर केला जात नाही. कांदा लागवड करताना रोपांमधील अंतर योग्य ठेवले जात नाही. कीड-रोग नियंत्रणासाठी "एकात्मिक' पद्धतीचा अवलंब करत नाही. अतिप्रमाणात पाणी दिल्यामुळे जमीन वाफशावर येतच नाही. कांदा पोसला जात नाही. कांदा लागवडीच्या 60 दिवसांनंतरही नत्राची मात्रा देतच राहतात, त्यामुळे शाकीय वाढ होते, कंद पोसला जात नाही. कांदे काढणीआगोदर योग्य कालावधीत 20 दिवस अगोदर पाणी सोडत नाही.
श्रकांदे काढणीनंतर पातीच्या सावलीखाली वाळवत नाहीत. किमान सात ते दहा दिवस वाळवणी केली पाहिजे. कांद्याची मान चार-पाच सें.मी. न ठेवता खरडून कापतात. यामुळे साठवणुकीतील नुकसान वाढण्याची शक्‍यता वाढते. शास्त्रोक्त पद्धतीच्या कांदा चाळीचा वापर साठवणुकीकरता न करता कांदा जमिनीवर साठविला जातो. साठवणुकीतील नुकसानीत वाढ होते. कांद्याची प्रतवारी योग्य पद्धतीने करत नाहीत, त्यामुळे भावात घट येते. आर्थिक नुकसान होते.

श्रखरीप कांद्याचे बियाणे-दोन वर्षे व रब्बीसाठी दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे वापरतात. योग्य पाणी व्यवस्थापन केले जात नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा